गरज पस्तीस कोटींची, दिले पावणे तीन कोटी
By Admin | Updated: March 27, 2015 23:58 IST2015-03-27T23:16:19+5:302015-03-27T23:58:23+5:30
अभयारण्यग्रस्तांचं आंदोलन सुरूच : आजपासून चांदोलीत जाणारे रस्ते अडविणार

गरज पस्तीस कोटींची, दिले पावणे तीन कोटी
कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वनविभागाने राज्य सरकारक डे ३५.५३ कोटींचा निधी मागितला; पण प्रत्यक्षात २.७० कोटी रुपयांचा निधी देऊन सरकारने अभयारण्यग्रस्तांची बोळवण केली आहे. परिणामी गेल्या बारा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. शुक्रवारी दुपारी कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रसाद यांनी बैठक घेऊन बेमुदत ठिय्या आंदोलन करणाऱ्या अभयारण्यग्रस्तांच्या नेत्यांसोबत चर्चा केली. या चर्चेवेळी मारुती पाटील, डी. के. बोडके, शंकर पाटील, चंद्रकांत चव्हाण, मारुती धोंडी पाटील, आदी उपस्थित होते. दरम्यान, आजपासून चांदोली अभयारण्यात जाणारे रस्ते अडविण्यात येणार असून, पर्यटकांना आत जाण्यास मज्जाव केला जाईल, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी व नागरी सुविधांसाठी राज्य सरकारकडे मागणी केलेल्या ३५ कोटी ५३ लाख रुपये निधीपैकी २ कोटी ७० लाखांचा निधी कोल्हापूर वनविभागाकडे आला असून, उर्वरित निधीकरिता आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती देऊन साईप्रसाद यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पहिल्या टप्प्यात नागरी सुविधा, बुडीत क्षेत्रातील जमिनीचा मोबदला, पुनर्वसनासाठी ६५ हेक्टर जमीन तसेच जाखले गावाजवळील जमीन संपादनासाठी २ कोटी ७० लाखच्या तोकड्या निधीत काहीही होणार नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मारुती पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
घरबांधणी निधीचे वाटप
अभयारण्यग्रस्तांना शुक्रवारी थोडा दिलासा मिळाला. जलसंपदा विभागाने घरबांधणी अनुदानापोटी प्रत्येक कुुुटुंबाला दहा हजार रुपये अॅडव्हान्सचे वाटप सुरू केले. शुक्रवारी २०० कुटुंबांना त्यांच्या बॅँक खात्यांवर ही रक्कम जमा केली, तर उर्वरित १५० कुटुंबांना लवकरच ही रक्कम दिली जाणार आहे.