हेल्पिंग हॅन्डस् भागवतेय दुष्काळग्रस्तांची तहान
By Admin | Updated: May 13, 2016 00:15 IST2016-05-12T22:54:51+5:302016-05-13T00:15:46+5:30
तासगावात खारीचा वाटा : स्वखर्चातून रोज दोन टँकर पाणी देण्याचा उपक्रम
हेल्पिंग हॅन्डस् भागवतेय दुष्काळग्रस्तांची तहान
दत्ता पाटील -- तासगाव -सततच्या दुष्काळामुळे तासगाव तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र दुष्काळग्रस्तांची तहान भागवण्यासाठी तासगावातील हेल्पिंग हॅन्डस् या संस्थेच्या माध्यमातून तरुणाईने पुढाकार घेतला आहे. स्वखर्चातून रोज दोन टँकर पाणी टंचाईग्रस्त गावांना उपलब्ध करून देत, त्यांनी खारीचा वाटा उचलला आहे. तासगाव तालुक्यातील बहुतांश गावांत पिण्याच्या पाण्याची भीषण अवस्था झाली आहे. लोकांना वणवण करावी लागत आहे. पाण्याचे स्रोत कोरडे पडल्यामुळे अनेक गावांत पाणी योजना कुचकामी ठरत आहेत. काही ठिकाणी प्रादेशिक योजनांची अवस्था बिकट आहे. दुष्काळी गावांची होणारी फरफट पाहून तासगाव शहरातील काही तरुणांनी खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेतला. हेल्पिंग हॅन्डस् या संस्थेच्या माध्यमातून या तरुणाईने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रोज दोन टँकर पाणी दुष्काळी गावांना देण्याचा संकल्प केला. एक तारखेपासून त्यांचा हा संकल्प अंमलात आला. लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय होईपर्यंत टँकर सुरु ठेवण्याचा मानस या तरुणांचा आहे. प्रशासनाकडून टँकरने होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. मात्र हेल्पिंग हॅन्डस्कडून टँकरने पाणी मिळाल्यानंतर गौरगाव, धामणी, पाडळी, बस्तवडे या गावांतील लोकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या गावांतील लोकांची मिळालेली कौतुकाची थाप, या तरुणांना प्रोत्साहन देणारी ठरली. प्रतिसाद पाहून संघटनेत सहभागी होण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला.
अशी झाली ‘हेल्पिंग हॅन्डस्’ची सुरुवात
तासगाव शहरात ३० ते ४० उच्चशिक्षित, समवयस्क तरुणांचा ग्रुप आहे. हे तरुण सतत एकत्रित येतात. एकत्रित येण्याचा फायदा समाजाला करुन देण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार समाजातील अडचणीच्या प्रसंगात, सामाजिक कार्यात योगदान देण्याचा संकल्प त्यांनी केला. त्यासाठी स्वकमाईतील काही पैसे खर्च करण्याचे ठरले. हेल्पिंग हॅन्डस् नावाची संस्था स्थापन केली. वर्षभरात या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. एक मेपासून स्वखर्चातून रोज दोन टँकर पाणीपुरवठा करण्याचा संकल्प करण्यात आला आणि जनतेला हेल्पिंग हॅन्डस्चा मदतीचा हात मिळाला. संस्थेच्या या कामाची दखल घेऊन पुण्यातील द पुना मर्चंटस् चेंबरने हेल्पिंग हॅन्डस्मार्फत पंचवीस टँकरची जबाबदारी उचलली आहे.