इस्लामपुरात चोरट्यांनी पळवली ६० हजारांची रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST2021-09-14T04:32:38+5:302021-09-14T04:32:38+5:30
इस्लामपूर : शहरातील बसस्थानकाच्या पश्चिमेला असणाऱ्या युनियन बँकेतून पैसे काढून बाहेर आलेल्या ७५ वर्षीय वृद्धाकडील ६० हजार रुपयांची रोकड ...

इस्लामपुरात चोरट्यांनी पळवली ६० हजारांची रोकड
इस्लामपूर : शहरातील बसस्थानकाच्या पश्चिमेला असणाऱ्या युनियन बँकेतून पैसे काढून बाहेर आलेल्या ७५ वर्षीय वृद्धाकडील ६० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवली. त्यानंतर तिघा चोरट्यानी दुचाकीवरून पलायन केले. सीसीटीव्हीची नजर असणाऱ्या परिसरात दिवसाढवळ्या हा प्रकार घडला.
तुलसीदास दादू कांबळे (वय ७५, मूळ रा. ईटकरे, सध्या-कामेरी रस्ता, इस्लामपूर) यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसात रात्री उशिरा फिर्याद दिली. कांबळे हे सकाळी ११.४० च्या सुमारास आपल्या मुलीसोबत दुचाकीवरून बँकेत आले होते. तेथे त्यांनी खात्यावरील ६० हजार रुपयांची रोकड काढली. ही रोकड कापडी पिशवीत ठेवून ती मुलीकडे देत दोघेही बँकेच्या बाहेर आले. दुचाकीजवळ आल्यानंतर मुलीच्या मानेवर काहीतरी खाजवत असल्याने तिने ६० हजारांची रक्कम असणारी कापडी पिशवी खाली ठेवली.
यादरम्यान पाठीमागून आलेल्या व्यक्तीने त्यांना पाणी लावा, असे सांगितले. त्यावेळी हे बाप-लेक पैशाची पिशवी तेथेच ठेवून पाणी आणण्यासाठी बाजूच्या दुकानात गेले. तेवढ्यात चोरट्याने संधी साधत ही रोकड असलेली पिशवी घेऊन बाजूलाच दुचाकीवर थांबलेल्या दोन साथीदारांच्या मदतीने पोबारा केला. नागरिकांनी आरडाओरडा करेपर्यंत हे चोरटे सांगलीच्या दिशेने पसार झाले.