‘ते’ जुन्या ओळखी काढून घरी येऊन बसतील, काळजी घ्या! : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:03 IST2019-03-27T21:02:03+5:302019-03-27T21:03:55+5:30
‘समोरचे उमेदवार जुन्या ओळखी काढून घरी येऊन बसतील, काळजी घ्या’, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे आपल्या

‘ते’ जुन्या ओळखी काढून घरी येऊन बसतील, काळजी घ्या! : जयंत पाटील
इस्लामपूर : ‘समोरचे उमेदवार जुन्या ओळखी काढून घरी येऊन बसतील, काळजी घ्या’, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.
यावेळी खा. शेट्टी यांनी, गुरुवारी सकाळी ११ वाजता कोल्हापूर येथील दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून आपण अर्ज दाखल करणार असल्याचे सांगून, आपण सर्वांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहनही केले.
खा. शेट्टी यांनी बुधवारी दुपारी इस्लामपूर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी खा. शेट्टी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.खा. शेट्टी म्हणाले, आपण सर्वांनी एकदिलाने, एकजुटीने ही निवडणूक लढवायची आहे. आमचा वधू पक्ष आहे, जरा सांभाळून घ्या. गेल्या १० वर्षांत काही कटू प्रसंग, संघर्ष झाला असेल तर विसरून जावा. तो वैचारिक संघर्ष होता. त्यामध्ये कोणाचे व्यक्तिगत हेवेदावे नव्हते. भाजपची हिटलरशाही प्रवृत्ती देशातून व राज्यातून हद्दपार करून देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत.
लोकसभा व पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ता व संपत्तीचा वारेमाप वापर करणार आहेत. गेल्या पाच वर्षांत ही मंडळी सत्ता, संपत्तीचा कसा गैरवापर करतात, हे मी अनुभवले आहे. त्यामुळे आपण ताकदीने लढा देत आपल्या शिवारात उगवलेले कमळ उखडून फेकून देऊया.
विजयराव पाटील म्हणाले, आम्ही आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळवा व शिराळा तालुक्यातून आपणास जास्तीत जास्त मताधिक्य देऊ.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी माणिकराव पाटील, पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, विनायक पाटील, देवराज पाटील, विष्णुपंत शिंदे, भीमराव पाटील, सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजी पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश पोपळे, भागवत जाधव, संजय बेले उपस्थित होते.