गतवर्षी बांधलेल्या बंधाऱ्यांची चौकशी करणार
By Admin | Updated: June 8, 2015 00:51 IST2015-06-07T23:36:09+5:302015-06-08T00:51:08+5:30
चंद्रकांत पाटील : २६६ कोटी ५९ लाखाच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास मंजुरी

गतवर्षी बांधलेल्या बंधाऱ्यांची चौकशी करणार
सांगली : गतवर्षी कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यास चालू वर्षासाठी २६६ कोटी ५९ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास मान्यताही देण्यात आली.
यावेळी खा. संजयकाका पाटील, खा. राजू शेट्टी, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, आ. शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, महापालिका आयुक्त अजिज कारचे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, सहायक जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी आदी उपस्थित होते.
गतवर्षी शेकड्यांनी कृषी विभागाच्यावतीने बंधारे बांधण्यात आले. याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. आमदारांनीही हे बंधारे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याची दखल घेत आता या सर्व बंधाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्याकरिता २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी मान्यता देण्यात आलेल्या २६६ कोटी ५९ लाखाच्या तरतुदीमध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी १९८ कोटी ५० लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ६७ कोटी ४ लाख आणि ओटीएसपीसाठी १ कोटी ४ लाख ५६ हजाराच्या निधीचा समावेश आहे. गतवर्षी जिल्ह्यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमध्ये १७४ कोटी ७५ लाखाचा निधी खर्च करण्यात आला होता. खर्चाची ही टक्केवारी ९९.८७ इतकी आहे. तसेच अनुसूचित जाती उपयोजनेमध्ये ३९ कोटी ३२ लाख ६५ हजाराचा खर्च करण्यात आला होता, खर्चाची ही टक्केवारी ९९.४१ टक्के इतकी आहे. तसेच ओटीएसपीमध्ये ७१ लाख ५९ हजार इतका खर्च करण्यात आला होता, खर्चाची ही टक्केवारी ७०.६३ इतकी आहे. अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवारसाठी २४ कोटी
नजीकच्या काळात गावा-गावात जलसाठे निर्माण करून टंचाईमुक्त गावे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात या अभियानातून १४१ गावे निवडण्यात आली असून याठिकाणी कामेही सुरु आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून २४ कोटीचा निधी देण्यात आला आहे. अन्य उपाययोजनांतून अधिकाधिक निधी उपलब्ध करुन हे अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय जिल्हा नियोजन समितीतून २ एक्साव्हेटर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर्षी ही कामे करणार
तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्राला आर. आर. पाटील यांचे नाव देणार
नावीन्यपूर्ण योजनांसाठी ७ कोटीचा निधी उपलब्ध
तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपाहारगृह
दोन एक्साव्हेटर
पालिकांना गॅस शवदाहिनी
माई घाट, कृष्णा घाट परिसराचे सुशोभिकरण
रिमांड होममधील मुलांसाठी वॉटर गिझर व सोलर पॅक
तासगाव तहसील कार्यालयात फायलिंगसाठी कॉम्पॅक्टर
आरवडे येथे ई-लर्निंग आणि डिजिटल क्लासरुम, बालभवन विज्ञान केंद्र