अक्षर लेखनातून ‘ते’ करताहेत सुविचारांची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST2021-03-31T04:26:08+5:302021-03-31T04:26:08+5:30
फाेटाे : ३० रामचंद्र मदने फाेटाे : ३० पुनवत ३.. ४ सहदेव खोत लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : स्वकौशल्याने ...

अक्षर लेखनातून ‘ते’ करताहेत सुविचारांची पेरणी
फाेटाे : ३० रामचंद्र मदने
फाेटाे : ३० पुनवत ३.. ४
सहदेव खोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : स्वकौशल्याने अक्षरलेखनाचे तंत्र शिकून, दररोज सुंदर अक्षरलेखन केलेला एक नमुना समाजमाध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवून शिराळा तालुक्यातील दोन प्राथमिक शिक्षक समाजात सदविचारांची पेरणी करत आहेत. शिवाय सुंदर अक्षरलेखनासाठी इतरांना प्रेरणा देत आहेत. निवास लोखंडे व रामचंद्र मदने अशी या उपक्रमशील शिक्षकांची नावे आहेत.
कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून प्राथमिक शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी सर्वच गुरुजन ऑनलाइन शिक्षण कामात व्यस्त आहेत. त्यातूनही वेळ काढीत अनेक उपक्रमशील शिक्षक आपापले छंद जोपासत आहेत. शिराळा तालुक्यातील वाडीभाग तडवळे शाळेचे शिक्षक निवास लोखंडे व सावंतवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रामचंद्र मदने हे यापैकीच.
या दोन शिक्षकांनी कोरोना सुटीच्या काळात ऑनलाइन शिक्षणाचे काम करतच आपला अक्षरलेखनाचा छंद जोपासला आहे. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत या दोघांनी अक्षरलेखनाचे कौशल्य आत्मसात केले आहे. यासाठीची आवश्यक असणारे महागडे पेन, कागद, शाई व इतर साहित्य खरेदी करून हे दोन शिक्षक गेल्या काही महिन्यांपासून दररोज सुलेखनाचा एक नमुना कागदावर तयार करीत आहेत. सुविचार, दिनविशेषप्रमाणे थोरामोठ्यांची वचने, सुभाषिते, आदींचे दररोज लेखन करून ते समाजमाध्यमातून आपले विद्यार्थी, पालक, शिक्षक व सर्व स्तरातील व्यक्तींपर्यंत पोहोचवून समाजात सदविचारांची पेरणी करीत आहेत. आपल्या सुंदर हस्ताक्षराने या शिक्षकांनी आपल्या शाळांच्या भिंतीही बोलक्या केल्या आहेत. त्यांच्या या कलेला समाजमाध्यमातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
प्रतिक्रिया -
सुंदर अक्षर हा एक दागिना आहे. हस्ताक्षर कौशल्यासाठी शाईचा पेन व नियमित सरावाची आवश्यकता आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.
- निवास लोखंडे, शिक्षक
प्रतिक्रिया -
एकंदरीतच या अक्षरमित्र शिक्षकांचे हस्ताक्षराचे सुंदर नमुने दररोज अनेकांच्या स्टेट्सवर झळकत आहेत. शिवाय सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांच्या या कलेतून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.