‘ते’ सहा कोटी ‘सांगली अर्बन’चेच
By Admin | Updated: November 16, 2016 00:31 IST2016-11-16T00:31:12+5:302016-11-16T00:31:12+5:30
गणेश गाडगीळ : कागदपत्रे दाखवून रक्कम ताब्यात घेऊ

‘ते’ सहा कोटी ‘सांगली अर्बन’चेच
सांगली : तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी केवळ संशयावरून ताब्यात घेतलेली सहा कोटींची रक्कम सांगली अर्बन बँकेचीच आहे. त्यात अनधिकृत काहीही नाही. ही रक्कम फक्त बँकेची मालमत्ता असून, सर्व कागदपत्रांच्या तपासणीनंतर ही रक्कम लवकरच बँकेच्या ताब्यात येईल, अशी माहिती सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. बँकेची सहा कोटींची रक्कम तुळजापुरात ताब्यात घेण्यात आली आहे. त्याबाबत गाडगीळ बोलत होते.
ते म्हणाले की, सांगली अर्बन बँकेच्या राज्यातील दहा जिल्ह्यांत ३५ शाखा आहेत. त्यापैकी नऊ शाखा मराठवाड्यात आहे. मुख्य कार्यालयात रोख रक्कम विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. ज्या शाखांना दररोजच्या व्यवहारासाठी रोख रक्कम लागते, त्या शाखांना या विभागामार्फत ती पुरवली जाते. ज्या शाखांकडे अतिरिक्त रक्कम असते, त्यांच्याकडून ती या विभागाकडे आणली जाते. याप्रमाणे दररोज व्यवहार होत असतात. रिझर्व्ह बँकेने ८ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार ५००, १००० च्या नोटा चलनातून रद्द झाल्या आहेत. १० तारखेपासून मोठ्या प्रमाणात रोख स्वरुपात रक्कम बँकांकडे जमा होत आहे. मराठवाड्यातील नऊ शाखांमध्येही मोठ्या प्रमाणात रकमेचा भरणा झाला आहे. संबंधित शाखांच्या क्षेत्रातील करन्सी चेस्ट असलेल्या राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी एकदम रक्कम स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. एवढी मोठी रक्कम शाखेत ठेवणे जोखमीचे असल्याने पूर्वापार पद्धतीप्रमाणे मराठवाड्यातील परभणी, माजलगाव येथील शाखांची कॅश मुख्य कार्यालयाकडे बँकेच्या वाहनाने बँकेचे अधिकृत चालक, इतर कर्मचारी यांच्यामार्फत आणण्याचे ठरले.
त्यानुसार १४ रोजी परभणीतील तीन कोटी, माजलगाव शाखेतील तीन कोटी अशी सहा कोटींची रक्कम मुख्य कार्यालयाकडे भरणा करण्यासाठी आणली जात होती. परभणीच्या एक हजारच्या दहा हजार नोटा, ५०० च्या ४० हजार नोटा, माजलगाव शाखेतील ५०० च्या ४८ हजार, १०० च्या ६० हजार नोटा होत्या. सांगलीत शंभरच्या नोटांचा तुटवडा असल्याने माजलगाव शाखेतील अतिरिक्त शंभर रुपयाच्या ६० लाख रकमेच्या नोटा मागवल्या होत्या. ही रक्कम आणताना बँकेचे वाहन १४ रोजी तुळजापूर येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी संशयाने ताब्यात घेतले. यासर्व नोंदी शाखांच्या कॅशबुकमध्ये आहेत. मुख्य कार्यालयातील डे बुकमध्ये ही रक्कम पेंडिंग दिसते. अधिकाऱ्यांना कागदोपत्री पटवून ही रक्कम लवकरच ताब्यात येईल, असेही गाडगीळ म्हणाले. (प्रतिनिधी)
आमदारांचा संबंध नाही
तुळजापुरात निवडणूक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेली सहा कोटीची रक्कम सांगली अर्बन बँकेची आहे. काहीजणांनी कारण नसताना या गोष्टीचा भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याशी संबंध जोडला आहे. या रकमेशी आमदारांचा काय संबंध? ही रक्कमच बँकेची मालमत्ता आहे. ही रक्कम आणताना कायदेशीर सर्व नियम पाळूनच आणली जात होती, असा खुलासा गणेश गाडगीळ यांनी केला.