जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये मिळणार शिथिलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:17+5:302021-05-30T04:22:17+5:30
सांगली : जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या सुरू असलेल्या निर्बंधांची एक जूनला मुदत संपणार असल्याने ...

जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये मिळणार शिथिलता
सांगली : जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या सुरू असलेल्या निर्बंधांची एक जूनला मुदत संपणार असल्याने त्यानंतर शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधितांची संख्या स्थिर राहिल्याने हा निर्णय होऊ शकतो. मात्र, राज्य शासनाच्या नियमावलीवरच कितपत शिथिलता द्यायची हे ठरणार आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. बाधितांची संख्या वाढतच चालल्याने लॉकडाऊनला चारवेळा मुदतवाढ देण्यात आली. आता एक जूनला त्याची मुदत संपणार आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर आहे. दररोज सरासरी एक हजार ते बाराशे रूग्ण आढळून येत आहेत, तर जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर २८ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आला आहे. यापेक्षाही कमी प्रमाण आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पॉझिटिव्हिटी दर व मृत्यूच्या वाढत्या संख्येमुळे सध्या जिल्हा ‘रेड झोन’मध्ये असला तरीही लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा विचार सुरू आहे.
पालकमंत्री जयंत पाटील यांनीही याबाबत सकारात्मक विचार करण्याचे निर्देश दिले असले तरी पॉझिटिव्हिटीचा टक्का, मृत्यू संख्येतील वाढ हे मुद्दे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. मात्र, लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत मागणी वाढत असल्याने योग्य त्या उपाययोजना राबवून दिलासा देण्याचा निर्णय होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. राज्य शासनाने याबाबत घेतलेल्या निर्णयांचीच अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.
कोट
जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबत चर्चा झाली असली तरी प्रत्यक्षात राज्य शासन जे निर्देश देईल। त्याचे पालन करण्यात येणार आहे. शासनाने याबाबत सुधारित आदेश दिल्यास त्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येणार आहे.
डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी.