जिल्हा बँकेतील नोकरभरती, भ्रष्टाचाराची चौकशी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:22+5:302021-02-05T07:31:22+5:30
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची दखल सहकार विभागातील अप्पर आयुक्त डॉ. पी. एल. खंडागळे यांनी ...

जिल्हा बँकेतील नोकरभरती, भ्रष्टाचाराची चौकशी होणार
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची दखल सहकार विभागातील अप्पर आयुक्त डॉ. पी. एल. खंडागळे यांनी घेतली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांना दिले आहेत.
स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी याबाबत तक्रार केली होती. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेड या कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या कंपनीस तीन कोटींची मालमत्ता असताना ६० कोटींचे व्हॅल्युएशन दाखवून २३ कोटींचे कर्ज दिले आहे. ज्यादिवशी बैठक झाली, त्याचदिवशी मंजुरीपत्र व त्याचदिवशी कागदपत्रांची पूर्तता न करताना तातडीने रक्कम अदा केली. ही रक्कम संबंधित कंपनीच्या खात्यावर वर्ग न करता वसंतदादा साखर कारखान्याच्या खात्यावर जमा करण्यात आली. हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील यांची नियुक्ती काही विशिष्ट संचालकांना मदत व्हावी म्हणून केली आहे. ते कार्यकारी संचालक म्हणून पात्र ठरत नाहीत.
संचालक मंडळाच्या सभेत सुमारे ७० कोटी रुपये ‘राईट ऑफ’ केले आहेत. त्यामध्ये बँकेच्या संचालकांच्या खासगी व त्यांच्या नेतृत्वाखालील काही सहकारी संस्थांचा समावेश आहे. सभेत कोरम नसताना बड्या संचालकाच्या कारखान्यास ३२ कोटी रुपये कर्ज देण्यात आले. कार्यालयीन शिफारस नसताना हे कर्ज दबाव टाकून देण्यात आले. रिझर्व्ह बँकेचे धोरण नसतानाही सोन्याच्या बिस्किटांवर १० लाख कर्ज देण्यास भाग पाडण्यात आले. नोकरभरतीतही मोठा घोटाळा झाला आहे. एन.पी.ए.ची रक्कम संचालक मंडळ सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांकडेच जास्त असल्याने वसुली ठप्प आहे. एन.पी.ए.चे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत गेलेले आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. याची दखल घेत अप्पर आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
कोट
संबंधित पत्राच्या अनुषंगाने चौकशी करण्याची सूचना प्राप्त झाली आहे. आमच्या स्तरावर योग्य त्या पद्धतीने याची शहानिशा करण्यात येईल.
- श्रीकृष्ण वाडेकर, विभागीय सहनिबंधक, कोल्हापूर