काँग्रेसच्या बैठकीत पुन्हा वाद उफाळला
By Admin | Updated: November 13, 2016 23:45 IST2016-11-13T23:45:45+5:302016-11-13T23:45:45+5:30
सांगलीत बैठक : अशोक चव्हाणांची शिष्टाई

काँग्रेसच्या बैठकीत पुन्हा वाद उफाळला
सांगली : विधानपरिषद निवडणुकीतील बंडखोरीचा प्रकार तातडीने थांबवून कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार मोहनराव कदम यांना पाठिंबा जाहीर करावा, पक्षाचे आदेश न पाळल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी विशाल पाटील गटाला दिला. वाद मिटविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच कदम-दादा गटात जोरदार वादावादी झाली.
सांगली-मिरज रस्त्यावर पोलिस मुख्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये रविवारी दादा व कदम गटातील वाद मिटविण्यासाठी अशोक चव्हाण यांनी बैठक घेतली. सांगली-सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीत विशाल पाटील गटाने बंडखोरी करून स्वतंत्र उमेदवार दिला आहे. याबाबत पक्षातील अनेक नेत्यांची शिष्टाई असफल ठरल्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी स्वत: शिष्टाईचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आल्याचे कॉँग्रेस कार्यकर्ते सांगत असले तरी, अद्याप यासंदर्भात विशाल पाटील गटाने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.
चव्हाण यांनी रविवारी सकाळी पतंगराव कदम यांच्या निवासस्थानी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याकडून निवडणुकीसंदर्भात माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत शेखर माने यांनी मोहनराव कदम यांना पाठिंबा दिला पाहिजे. त्यांनी बंडखोरी थांबविली नाही, तर तातडीने कारवाईचा निर्णयही घेतला जाईल.
वसंतदादांच्या जन्मशताब्दीचा सोहळा संपल्यानंतर अशोक चव्हाण यांनी दुपारी एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीस त्यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. पतंगराव कदम, आ. आनंदराव पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, महापौर हारुण शिकलगार, विशाल पाटील, महापालिकेतील गटनेते किशोर जामदार, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
बैठकीत विशाल पाटील यांनी पतंगराव कदम, विश्वजित कदम यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. कोणत्याही राजकीय निर्णयात आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. पक्षीय स्तरावर ते स्वत:च निर्णय घेत असतात. महापालिकेतही यापूर्वी असेच घडल्याची तक्रार त्यांनी मांडली. पतंगरावांनी हा मुद्दा खोडून काढत, पक्षात कोणाचीही इच्छा नसताना महापालिकेमध्ये यांना उपमहापौरपद दिले. त्यानंतरही यांनी स्वतंत्र गट स्थापून काय काय केले, हे सगळ्यांना माहीत आहे, असे सांगितले. त्यानंतर विशाल पाटील यांनी लोकसभेचा मुद्दा उपस्थित केला. लोकसभेच्या निवडणुकीत यांच्या मतदारसंघात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला कमी मते मिळाल्याचे सांगितले.
पतंगराव म्हणाले की, गत निवडणुकीत मोदी लाटेत सर्वच उमेदवारांना कमी मते मिळाली होती. त्यापूर्वीच्या एका निवडणुकीत काय झाले, हे सगळ्यांना माहीत आहे. आजवर आमच्या मतदार संघातून खासदारकीच्या निवडणुकीत कायम मताधिक्य मिळाले, त्याचा उल्लेख का होत नाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)
विशाल पाटील यांना आदेश
चव्हाण म्हणाले की, दोन्ही नेत्यांनी एकमेकांची उणी-दुणी काढू नयेत. वाद मिटविले पाहिजेत. पतंगराव कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी काम करावे. मात्र कदम यांनीही सर्वांना विश्वासात घ्यावे. आपसातील मतभेद दूर करावेत. पक्षाला या दोन्ही घराण्यांची आवश्यकता आहे. विशाल पाटील यांनी त्यांच्या नगरसेवकांकडून मोहनराव कदम यांना पाठिंबा जाहीर करावा, असे आदेश त्यांनी दिले.
जिल्हाध्यक्ष पदाचाही मुद्दा
विशाल पाटील यांनी, मोहनराव कदम यांच्याकडे पंधरा वर्षे असलेल्या जिल्हाध्यक्ष पदाचा मुद्दा उपस्थित केला. अशोक चव्हाण यांनी, याबाबतचा निर्णय प्रदेश कार्यकारिणी घेत असते, त्यामुळे हा विषय आताच काढण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले.
अद्याप भूमिका गुलदस्त्यात
विशाल पाटील गटाने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे पक्षाचा आदेश ते पाळणार, की बंडखोरी कायम ठेवणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.