येळावीत उसाचा फड पेटला
By Admin | Updated: October 25, 2015 00:38 IST2015-10-25T00:38:36+5:302015-10-25T00:38:36+5:30
१५ लाखांचे नुकसान : प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

येळावीत उसाचा फड पेटला
येळावी : येळावी (ता. तासगाव) येथील शेरेकर वस्तीवर चोरून घेतलेल्या वीज कनेक्शनमधून शॉर्टसर्किट झाल्यामुळे उसाच्या फडास आग लागली. आगीत तीन ते चार एकरातील ऊस, ठिबक सिंचन व इत्तर साहित्याचे १५ लाखांचे नुकसान झाले.
यशवंत बापू माने व त्यांचा मुलगा अधिक माने यांनी माळरानावर उसाचे पीक घेतले होते. प्रसंगी उसनवार पाणी घेऊन व भरमसाठ पाणीपट्टी देऊन हे पीक बहरात आणले होते. परंतु शेजारील दोन शेतकरी वीजचोरी क रून दोन विद्युत मोटारपंप चालवत होते. यामुळे विद्युत तारेवरील दाब वाढल्याने शॉर्टसर्किट होऊन उसाच्या फडाला आग लागली. आग विझविण्यासाठी साधनसामग्री व मनुष्यबळ नसल्याने मोठे नुकसान झाले. याप्रकरणी यशवंत माने यांचे ऊस आणि शेतातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. दोन शेतकऱ्यांचा अडीच एकरातील ऊस जळाला आहे. माने यांना दिलासा देण्याऐवजी विद्युत चोरी करणारे शेतकरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार माने यांनी केली आहे.
याबाबत तासगाव उपकार्यकारी अभियंता होनमाने यांना याबाबत लेखी तक्रार दिली असता, त्यांनी या विद्युत चोरी केलेल्या शेतकऱ्यांचे लेखी पत्र घेऊन येण्यास सांगितले. येळावीच्या स्थानिक वायरमनने वेळोवेळी या चोरीबद्दल वरिष्ठांकडे माहिती दिल्याचे सांगितले जात आहे, पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)