ऊस दरावर कायमचा तोडगा हवा

By Admin | Updated: November 9, 2014 23:40 IST2014-11-09T23:06:17+5:302014-11-09T23:40:48+5:30

संजय पाटील : पन्नास खासदारांचे शिष्टमंडळ मोदींना भेटणार

There is a permanent solution on the sugarcane rate | ऊस दरावर कायमचा तोडगा हवा

ऊस दरावर कायमचा तोडगा हवा

सांगली : ऊस दराच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याकरिता महाराष्ट्र व कर्नाटकातील ५0 खासदारांचे शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्यादृष्टीने योग्य भूमिका मांडली असली तरी, कारखानदारांचेही काही प्रश्न आहेत. त्यांना ते दर परवडणार आहेत का, या गोष्टींचाही विचार झाला पाहिजे. दोन्ही बाजूंनी योग्य समन्वय साधून तोडगा काढण्याची गरज आहे. साखर उद्योग टिकावा, यासाठी कायमस्वरुपी दराच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची गरज आहे. त्यासाठी दोन-तीन प्रस्ताव तयार करून ते केंद्र व राज्य शासनाकडे सादर करण्यात येतील. पन्नास खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटून कायमस्वरूपी तोडग्याची मागणी करणार आहे. राज्यातही आता ऊस दर नियंत्रण समिती स्थापन झाली आहे. समितीची बैठक झाल्यानंतर या विषयीची भूमिका आम्ही केंद्र शासनापुढे मांडू.
जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या चौकशीबाबत ते म्हणाले की, राज्यातील ज्या सहकारी संस्थांची कलम ८८ अंतर्गत चौकशी चालू होती, त्यास यापूर्वीच्या सरकारने स्थगिती दिली होती. आता ही स्थगिती उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रखडलेल्या चौकशा आता सुरू होतील. त्यातून सत्य बाहेर येईल. त्यामुळे शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. अन्न महामंडळाच्या सल्लागार समितीमार्फत सक्षम अन्नपुरवठा यंत्रणा उभारण्यासंदर्भात प्रस्ताव दिला जाईल. सल्लागार समितीचा अध्यक्ष म्हणून मी सध्या या यंत्रणेचा आढावा घेत आहे. बायोमेट्रिक पद्धतीने पुरवठा करण्याच्या यंत्रणेतील त्रुटी व चांगल्या गोष्टींचा अभ्यास करून त्याविषयी प्रस्तावात उल्लेख करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

आरेवाडी गाव दत्तक
मी आरेवाडी गाव दत्तक घेतले आहे. याठिकाणी प्रसिद्ध बिरोबा मंदिरासह इस्कॉनचे मंदिरही आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा बळकट करून पर्यटनवाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. दरवर्षी एक गाव दत्तक घेण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

नेहमी आर. आर. पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या संजय पाटील यांनी आज त्यांच्याविषयी सावध भूमिका घेतली. जनतेचा कौल मान्य करून आता टीकेपेक्षा विकास कामांसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करून त्यांनी आर. आर. पाटील यांच्यावर कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.


राज्याच्या मंत्रिमंडळात पूर्वीपासून सांगली जिल्ह्याला दोन-तीन मंत्रीपदे मिळाली आहेत. भाजप सरकारमध्येही आता जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळावीत, अशी आग्रही मागणी आम्ही केली आहे. सरकार स्थापनेविषयीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याविषयी निर्णय होईल, असे पाटील यांनी सांगितले.

Web Title: There is a permanent solution on the sugarcane rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.