रत्नागिरी-नागपूर महामार्गालगत सेवारस्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:30+5:302021-09-02T04:56:30+5:30
मिरज : मिरज शहर व मिरज पूर्व भागातून जाणाऱ्या सुमारे ३० किलाेमीटर लांबीच्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत कोठेच सेवा रस्ता ...

रत्नागिरी-नागपूर महामार्गालगत सेवारस्ताच नाही
मिरज : मिरज शहर व मिरज पूर्व भागातून जाणाऱ्या सुमारे ३० किलाेमीटर लांबीच्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत कोठेच सेवा रस्ता नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व वाहनधारकांची अडचण होणार आहे. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहर सुधार समितीने आमदार सुरेश खाडे यांच्याकडे केली. खाडे यांनी केंंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे महामार्गालगत सेवा रस्त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन समितीला दिले.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात मिरज शहरासह मिरज तालुक्यातील भोसे, मालगाव, बोलवाड, आरग, वड्डी यासह पंधराहून अधिक गावांतील जमिनींचे संपादन करण्यात आले आहे. सुमारे ३० किलाेमीटरचा महामार्ग मिरज तालुक्यातून जातो. या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी केवळ महामार्गावरून खाली जाण्यासाठी मार्ग केला आहे. पूर्ण रस्त्याला दोन्ही बाजूला सिमेंटचे कुंपण बसविण्यात येत आहे. महामार्गालगत कोठेच सेवा रस्ता नसल्याने शेतकरी व रहिवाशांची कोंडी होणार आहे. सेवा रस्त्याअभावी गेल्या सहा महिन्यांत अनेक वाहनधारकांना जीव गमवावा लागला आहे.
याबाबत शहर सुधार समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी केल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात रस्त्याच्या कामाबाबत कोणताच समन्वय नसल्याने सेवा रस्त्याशिवाय महामार्ग झाल्यास शहर व तालुक्यातील १५ गावांतील शेतकरी व रहिवाशांची अडचण होणार आहे. याबाबत शहर सुधार समितीचे ॲड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, ॲड. झाकीर जमादार, संतोष माने, बाळासाहेब पाटील, अक्षय वाघमारे, श्रीकांत महाजन, सचिन गाडवे यांनी आमदार सुरेश खाडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली. खाडे यांनी ही बाब केंंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून सेवा रस्त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.