स्वार्थी प्रवृत्तीला अजिबात थारा नको
By Admin | Updated: September 11, 2014 23:04 IST2014-09-11T22:33:59+5:302014-09-11T23:04:40+5:30
विजय सगरे : महांकाली कारखान्याच्या प्रचारास प्रारंभ

स्वार्थी प्रवृत्तीला अजिबात थारा नको
कवठेमहांकाळ : राजकीय स्वार्थासाठी महांकाली कारखान्याच्या तालुक्यातील विकास केंद्रात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला जनतेने व सभासदांनी खड्यासारखे वेचून बाजूला फेकावे, त्यांना थारा देऊ नका, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांनी केले. आज (गुरूवार) कवठेमहांकाळ येथील महांकालीदेवीच्या मंदिरात महांकाली कारखान्याच्या निवडणूक प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विजयराव सगरे म्हणाले, कवठेमहांकाळसारख्या दुष्काळी भागात नानासाहेब सगरे यांनी महांकाली कारखान्याच्यारुपाने लावलेले विकासाचे रोपटे आजवर आपण जिद्दीने वाढविले व जपले आहे. परंतु राजकीय स्वार्थापोटी काही विरोधक कारखान्याची निवडणूक लावून या विकास केंद्रात अडथळा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. परंतु तालुक्यातील सभासद व जनता विरोधकांचे हे कटकारस्थान मोडून काढेल, असा विश्वासही सगरे यांनी व्यक्त केला.
माणिकराव भोसले म्हणाले की, विजयराव सगरे, तुम्ही राजकीय भूमिका घेताना उघडपणे आबांच्या पाठीमागे उभे राहा आणि तुमच्याबाबत असणारा गैरसमज खोडून काढा. आम्ही कॉँग्रेस पक्षाच्यावतीने ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहू.
सुरेश पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे सर्व सेनापती व सैनिक कारखान्याच्या निवडणुकीत सगरे यांच्या पाठीशी उभे राहून विरोधकांना चारीमुंड्या चित करतील. तसेच गृहमंत्री पाटीलही आपली सर्व ताकद सगरेंच्या पाठीशी उभी करतील. त्यामुळे विरोधकांची डाळ कदापी शिजणार नाही.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नामदेवराव करगणे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने महांकाली कारखान्याच्या निवडणुकीत विजयराव सगरेंना पूर्ण ताकद देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बाळासाहेब गुरव, विठ्ठलराव कोळेकर यांचीही भाषणे झाली. चंद्रकांत हाक्के, भानुदास पाटील, किसन पाटोळे, पिंटू कोळेकर, किशोर पाटील, आप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब पाटील, गणपती सगरे, सुरगौंड पाटील, बांधकाम सभापती दत्ताजीराव पाटील, अनिल शिंदे, जगन्नाथ कोळेकर, पतंगराव यमगर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)