हिराबागच्या सात एकर जागेवर महापालिकेची मोहोरच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:41+5:302021-02-05T07:29:41+5:30

सांगली : शहरातील हिराबाग वाॅटर वर्क्सच्या सात एकर जागेवर अद्यापही महापालिकेचे नाव लागलेले नाही. गेली ५७ वर्षांपासून महापालिका प्रशासनाने ...

There is no municipal land on Hirabag's seven acres | हिराबागच्या सात एकर जागेवर महापालिकेची मोहोरच नाही

हिराबागच्या सात एकर जागेवर महापालिकेची मोहोरच नाही

सांगली : शहरातील हिराबाग वाॅटर वर्क्सच्या सात एकर जागेवर अद्यापही महापालिकेचे नाव लागलेले नाही. गेली ५७ वर्षांपासून महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. भविष्यात ७५ कोटीच्याजागेवर पाणी सोडावे लागले तर त्याला कोण जबाबदार? असा सवाल करत माजी नगरसेवक हणमंत पवार यांनी याबाबत आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ही जागा तातडीने नावावर करून घेण्याची मागणी केली आहे.

महापालिका क्षेत्रातील अनेक खुल्या भूखंडांची राजरोसपणे विक्री सुरू आहे. आरक्षण व ओपन स्पेसच्या जागांवर महापालिकेचे नावच लावलेले नाही. परिणामी मूळ मालकांकडून या जागा ताब्यात घेऊन परस्परच विकल्या जात आहेत. तरीही महापालिका प्रशासन व नगररचना विभाग झोपा काढत आहेत. असाच धक्कादायक प्रकार हिराबाग वाॅटर वर्क्सच्या जागेबाबत समोर आला आहे. माजी नगरसेवक हणमंत पवार यांनी याबाबत प्रशासनाला सावध केले आहे. त्यांनी आयुक्तांनीही पत्र पाठविले आहे.

तत्कालीन सांगली संस्थानाने हिराबाग येथील सात एकर जागा सांगली नगरपालिकेला पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यासाठी दिली होती. गेली ५७ वर्षे या जागेवर जलशुद्धिकरण केंद्र, पाण्याची टाकी, पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाचे कार्यालय आणि उपायुक्त व इतर कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान आहे. तसेच एक बालवाडीची शाळाही या परिसरात आहे; पण जागेच्या सातबाऱ्यावर अजूनही चिंतामणराव पटवर्धन यांचेच नाव दिसून येते. तत्कालीन नगरपालिका व आताच्या महापालिकेने अजूनही ही जागा आपल्या नावावर केलेली नाही. सध्याच्या बाजारभावाने या जागेची किंमत जवळपास ७० ते ७५ कोटींच्या घरात असल्याचे पवार यांनी सांगितले. भविष्यात ही जागा मूळ मालकांकडून परत मागितली जाऊ शकते. त्यामुळे महापालिकेने तातडीने या जागेवर आपले नाव लावण्याची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

चौकट

कोट्यवधीची जागा वाचवा : पवार

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली हिराबाग वाॅटर वर्क्सच्या जागेबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांना पत्र पाठविले आहे. या जागेवर प्रॉपर्टीधारक म्हणून महापालिकेचे अद्यापही नाव नाही. त्यामुळे चिंतामणराव पटवर्धन यांचे नाव कमी करून महापालिकेचे नाव लावण्यासाठी सिटी सर्व्हे कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून कोट्यवधीची ही जागा वाचविण्यासाठी नगररचना विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणी हणमंत पवार यांनी केली.

Web Title: There is no municipal land on Hirabag's seven acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.