इथे रुग्णवाहिकेलाही मिळत नाही वाहतूक कोंडीतून रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST2021-01-20T04:27:04+5:302021-01-20T04:27:04+5:30
फोटो आहे... लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : एकेका सेकंदाला जगण्या-मरण्याच्या कुंपणावर तडफडणाऱ्या तसेच असह्य वेदनांमुळे जलद उपचारासाठी प्रतीक्षा करणाऱ्या ...

इथे रुग्णवाहिकेलाही मिळत नाही वाहतूक कोंडीतून रस्ता
फोटो आहे...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : एकेका सेकंदाला जगण्या-मरण्याच्या कुंपणावर तडफडणाऱ्या तसेच असह्य वेदनांमुळे जलद उपचारासाठी प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णवाहिका ही जीवनदायिनी ठरत असते, मात्र शहरातील वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढताना ही जीवनदायिनीच मरणयातना भोगत आहे. आपत्कालीन वाहन असतानाही शहरातील रस्त्यांवर तिची अडवणूक करण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याचा प्रकार दिसून आला.
रुग्णवाहिकेला शहरातून मार्ग काढताना सध्या अडथळ्यांची मोठी शर्यत पार पाडावी लागते. यात रुग्णांचा जीव टांगणीला लागल्याचे सतत पाहावयास मिळत आहे. आपत्कालीन वाहनास अडथळा आणल्यास दंडाची व शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय माणुसकीच्या नात्याने एखाद्या रुग्णाला तातडीने उपचार मिळायला हवेत, या भावनेने संबंधित वाहनाला वाट करून देणे ही प्रत्येकाची जबाबदारीही आहे. तरीही ना नियम पाळले जातात, ना जबाबदारी. प्रत्येक वाहनधारक स्वत:चा विचार करून आपले वाहन रेटण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळणे मुश्कील होत आहे. या वाहनांना चौकातून वाट मोकळी करून देण्याची जबाबदारी असलेले वाहतूक पोलीसही बघ्याची भूमिका घेत असतात.
चौकट
एकालाही नाही दंड
सांगली शहरात शासकीय रुग्णालयापासून वानलेस रुग्णालयाकडे निघालेल्या रुग्णवाहिकेस (क्र. एमएच १०, सीआर ६७३३) विश्रामबाग व मिशन हॉस्पिटल चौकात दोन वेळा अडथळे निर्माण झाले, मात्र वाहतूक पोलिसांनी ना रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली, ना कोणालाही दंड करण्यात आला. रुग्णवाहिका चालकांनी सांगितले की, त्यांच्या आजवरच्या सेवेत कोणाला याबद्दल दंड ठोठावल्याची घटना कधीच घडली नाही.
चौकट
रुग्णवाहिकेस अडथळा आणणाऱ्यांना असा होतो दंड
रुग्णवाहिका, आपत्कालीन वाहनांचा रस्ता अडवल्यास १० हजार रुपये दंड, ३ महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद मोटार वाहन कायद्यात केली आहे. तरीही या नियमांची अंमलबजावणी सांगली जिल्ह्यात होत नाही. त्यामुळे रुग्णवाहिकांचा रस्ता अडविण्याचे प्रकार वाढले आहेत.
कोट
रुग्णवाहिका ही आपत्कालीन सेवा असल्याने तिला अडथळे निर्माण होऊ नयेत. पोलिसांना यापूर्वीही तशा सूचना दिल्या आहेत. यापुढेही रुग्णवाहिकांना अडथळ्यांचा सामना कुठे करावा लागू नये म्हणून दक्षतेच्या सूचना दिल्या जातील. त्याबाबत अधिक काळजी घेऊ.
-दीक्षितकुमार गेडाम जिल्हा पोलीस अधीक्षक, सांगली
कोट
वाहतुकीच्या कोंडीचा सामना आम्ही अनेक वेळा केला आहे. अशावेळी रुग्णांच्या वेदना आम्हाला सहन होत नाहीत. शासकीय रुग्णालयाच्या परिसरातूनच अतिक्रमणे, अरुंद रस्ते, वाहतुकीच्या कोंडीचा सामना करीत आम्हाला पुढे जावे लागते.
-विकास अब्दागिरे, रुग्णवाहिका चालक, सांगली
असा झाला प्रवास
१२.४५ मि.
सिव्हिल हॉस्पिटल
१२.५५ वा
विश्रामबाग चौक
१.२८ वा
मिशन हॉस्पिटल
प्रवासास
पाऊण तास