खानापूर तालुक्यात केवळ तीनच शासकीय कोविड सेंटर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:52+5:302021-05-19T04:26:52+5:30
दिलीप मोहिते लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोनावरील मोफत उपचारासाठी केवळ तीनच शासकीय कोविड सेंटर्स ...

खानापूर तालुक्यात केवळ तीनच शासकीय कोविड सेंटर्स
दिलीप मोहिते
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोनावरील मोफत उपचारासाठी केवळ तीनच शासकीय कोविड सेंटर्स कार्यरत आहेत. तेथे अवघ्या ७४ रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा आहे, तर खासगी कोविड सेंटरमध्ये २५ ते ३० हजार रुपये अनामत घेतल्याशिवाय रुग्णाला प्रवेशच मिळत नाही.
तालुक्यात कोणत्याच खासगी कोविड रुग्णालयाने शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना घेतलेली नाही. ग्रामीण भाग कोरोनामुळे उद्ध्वस्त होत असल्याचे भयानक वास्तव पुढे येत आहे.
विटा शहरात दोन, तर भिवघाट (करंजे) येथे एक अशी तीनच शासकीय कोविड सेंटर्स सुरू आहेत. या तीन सेंटरमध्ये ७४ बेड असून तेथे रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. विटा शहरात ५, खानापूर येथे एक व आळसंद येथे एक अशी ७ खासगी कोविड रुग्णालये आहेत. तेथे २०५ बेडची व्यवस्था आहे. केवळ ११ ते १२ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत.
शासकीय रुग्णालयांत केवळ अँटिजन व आरटीपीसीआर कोविड चाचणी केली जाते. तालुक्यात सरकारी यंत्रणेकडे सध्या एचआरसीटीची व्यवस्था नाही. त्यामुळे रुग्णांना पैसे देऊन ही चाचणी करावी लागत आहे.
सोमवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार विटा शहरात २८३, तर तालुक्यात ८१० असे १०९३ रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील ७४ रुग्ण सरकारी कोविड सेंटरमध्ये मोफत उपचाराचा लाभ घेत आहेत, तर उर्वरित रुग्ण विटा, खानापूर, सांगली, मिरज, कऱ्हाड, पुणे, कुपवाडसह विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. सरकारची यंत्रणा अपुरी व ‘खासगी’च्या हातात सुरी, अशी परिस्थिती आहे.
चौकट
विटा शहरासह खानापूर तालुक्यात दि. १ एप्रिल ते १७ मेअखेर कोरोना रुग्णांची संख्या ३७७५ होती. त्यातील २५८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून दीड महिन्यात ९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या १०९३ रुग्ण उपचाराखाली आहेत.