...तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र निवडणुका लढतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:31+5:302021-06-21T04:18:31+5:30
सांगली : राज्यातील महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. काँग्रेस जर स्वबळावर अडून राहिली ...

...तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र निवडणुका लढतील
सांगली : राज्यातील महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. काँग्रेस जर स्वबळावर अडून राहिली तर राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रित निवडणुकीला सामोरे जातील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत स्पष्ट केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्याबाबत विचारता पाटील म्हणाले की, राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्रित सामोरे जातील. त्यातूनही काँग्रेस स्वबळावर अडली तर शिवसेना-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढतील.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत महापुराबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत पाटील म्हणाले की, जलसंपदा विभागाने २५० हून अधिक ठिकाणी पाऊस व नदीच्या पाणी पातळीतील वाढ मोजण्यासाठी यंत्रणा बसविली आहे. तशीच यंत्रणा कर्नाटकातही उभारली जाणार आहे. नदीच्या पाणी पातळीचा अंदाज आल्यास पूरबाधितांचे वेळेवर स्थलांतर करता येऊ शकते. जलसंपदा विभागाने गावोगावी पाणी पातळीचे नकाशे दिले आहेत. यंदा पूर येणार नाही, अशी आशा आहे, पण पुराचे संकट आल्यास राज्यातील महाआघाडीचे सरकार झोकून देऊन काम करेल, अशी ग्वाहीही दिली.
चौकट
प्रताप सरनाईकांचे आरोप फेटाळले
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत जयंत पाटील म्हणाले की, सरनाईक यांनी काय पत्र दिले, हे मला माहीत नाही. अलिकडच्या काळात राज्यात शिवसेनेतून काँग्रेस-राष्ट्रवादीत कुणी गेल्याचे दिसत नाही. कदाचित त्यांच्या मतदारसंघात असा प्रकार घडला आहे का, हे तपासावे लागेल. त्यांच्या पत्रामुळे शिवसेना-राष्ट्रवादीत वितुष्ट निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
चौकट
सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात अजितदादा आघाडीवर
पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवरून भाजपने टीकेची झोड उठविली आहे. त्याबाबत जयंत पाटील म्हणाले की, नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलावले होते. अजितदादा येणार म्हणून लोकांनी मोठी गर्दी केली. भाषणात त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. त्यांना गर्दी अपेक्षित नव्हती. सर्वात जास्त सोशल डिस्टन्सिंग अजितदादाच पाळतात. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही.