शहरातील २५ हून अधिक विहिरींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:34+5:302021-09-02T04:55:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रात खासगी मालकींच्या विहिरी गायब होऊ लागल्या आहेत. शहराचा विस्तार वाढू लागल्याने विहिरी ...

Theft of more than 25 wells in the city | शहरातील २५ हून अधिक विहिरींची चोरी

शहरातील २५ हून अधिक विहिरींची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका क्षेत्रात खासगी मालकींच्या विहिरी गायब होऊ लागल्या आहेत. शहराचा विस्तार वाढू लागल्याने विहिरी मुजवून त्यावर काँक्रीटचे जंगल उभे राहू लागले आहे. जवळपास २५ हून अधिक विहिरी बुजविल्या आहेत. त्यावर महापालिका, जिल्हा प्रशासनाचे कसलेही निर्बंध नसल्याने विहिरी बुजविण्याचा सपाटा सुरूच आहे.

शहरात केवळ खासगी मालकीच्याच नव्हे, तर सार्वजनिक मालकीच्या विहिरींची चोरी झाली आहे. अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली विहिरी बुजविल्या जात आहेत. विशेषत: उपनगराचा विस्तार वाढू लागल्यानंतर या प्रकारात वाढ झाली. पूर्वी शहराचा आजूबाजूला शेतीक्षेत्र होती. तिथे विहिरी होत्या. पण आता त्या गायब झाल्या आहेत.

चौकट

हे घ्या पुरावे

१. महापालिका मुख्यालयाच्या दक्षिण बाजूला पूर्वी विहीर होती. वीस वर्षांपूर्वी या विहिरीवर स्लॅब टाकून ती बुजविण्यात आली. आता तिथे वाहनांचे पार्किंग आहे.

२. संजयनगर परिसरात एक विहिरी होती, तसेच त्या लगत मुरुम काढल्याने खणही तयार झाली होती, पण आता विहीर व खण बुजवून तिथे घरकूल योजना राबविण्यात आली आहे.

३. नेमीनाथनगर येथेही एका खासगी जागेत रस्त्यालगतच विहीर होती. आता तिथे रुग्णालयाचे काम सुरू झाले आहे.

चौकट

नाल्यांचा प्रवाह थांबविला, उभारल्या इमारती

१. सांगली-इस्लापूर बायपास रस्त्यालगतच्या शेरीनाला परिसरात नैसर्गिक नाल्याचा प्रवाह वळवून प्लाॅट पाडण्यात आले आहे. तिथे इमारती, अपार्टमेंट उभारल्या आहेत.

२. विजयनगर परिसरातील कुंभारमळा परिसरातही नाल्यावर अपार्टमेंट बांधले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात हा परिसर पाण्याखाली जातो.

चौकट

स्थानिक प्रशासन म्हणते...

खासगी मालकीच्या जागेतील विहिरी परस्परच बुजविल्या जातात. ते आमच्याकडे परवानगीसाठी येत नाहीत. सार्वजनिक विहिरीबाबत मात्र पालिकेने त्याचे पुनर्भरण केले आहे. जिल्हाधिकारी बंगल्यासह मिरजेतील एका विहिरीचे पुनर्भरण करून तेथील पाण्याचा वापर सुरू केला आहे.

- अमीर मुलाणी, पाणीपुरवठा विभाग

चौकट

तलावांचे सुशोभीकरण

महापालिका क्षेत्रात काळी खण व मिरजेचे गणेश तलाव या दोन्ही जतन केले जात आहे. दोन्ही तलावांच्या सुशोभीकरणावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे खर्च होतात. सध्या काळी खण सुशोभीकरणाचा दीड कोटीचे कामही हाती घेण्यात आले आहे.

चौकट

- पाण्याचे मूळ स्रोताचे जतन करण्याची गरज आहे. विहीर, तलावाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच नागरिकांची आहे. विहिरी बुजविल्यामुळे पर्यावरणावरही त्याचा परिणाम होतो. त्यासाठी प्रशासनाने दक्ष राहिले पाहिजे.

- अजित पाटील, पर्यावरणप्रेमी

-

Web Title: Theft of more than 25 wells in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.