नाट्यकला जिवंत राहणे आवश्यक
By Admin | Updated: December 17, 2014 23:57 IST2014-12-17T23:45:07+5:302014-12-17T23:57:49+5:30
दयानंद नाईक : ‘एसटी’च्या ४४ व्या आंतरविभागीय स्पर्धेस प्रारंभ

नाट्यकला जिवंत राहणे आवश्यक
सांगली : श्रमिक लोकांनी नाट्यकला सादर करणे याला अत्यंत महत्त्व असून, कला जिवंत राहणे आवश्यक असल्याचे मत नाट्यदिग्दर्शक आणि माजी नाट्यपरिषद अध्यक्ष डॉ. दयानंद नाईक यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली विभागाच्यावतीने ४४ व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धांना येथील भावे नाट्यमंदिरात प्रारंभ झाला. यावेळी डॉ. नाईक यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. डॉ. नाईक म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रमाणात हे नाट्य असतेच. ते व्यक्त करता आले पाहिजे. एसटीतील कर्मचाऱ्यांनी स्वत:चे काम सांभाळून नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. लहानपणापासूनच आपले एसटीबरोबर एक भावनात्मक नाते जोडलेले असते, असेही त्यांनी सांगितले.
नाट्य स्पर्धेस सातारा विभागाच्या ‘निष्पाप’ या नाटकाने प्रारंभ झाला. येथील भावे नाट्यमंदिरात दि. १६ ते २० डिसेंबर या कालावधित
स्पर्धा होणार आहे. बुधवार, दि. १७ रोजी कणकवली विभागाचे
‘तर्पण’, दि. १८ रोजी लातूरचे ‘सागर’, दि. १९ रोजी रायगडचे ‘थॅक्यू मिस्टर ग्लॅड’, दि. २० चे रत्नागिरीचे ‘द गेम आॅफ डेस्टिनी’ हे नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत.
उद्घाटनाच्या कार्यक्रमास अॅड. बाबासाहेब मुळीक, प्रतापराव सावंत, अशोक पाखरे, आर. सी. पाटील, वृषाली पोटे, मनीषा पवार, आय. ए. मुजावर, माणिक सुतार, शमू मुल्ला आदी उपस्थित होते. विक्रम हांडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)