सांगली : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विविध कारणांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर घातलेली स्थगिती अखेर उठवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे साखर कारखाना, सुतगिरण्या, विकास सोसायट्यांसह निवडणुकीस पात्र असलेल्या तब्बल २५१ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांना निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्याने प्रशासनही कामाला लागले आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मागील वर्षी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्यामुळे अनेक संस्थांची निवडणूक प्रक्रिया रखडली होती. आता ही स्थगिती उठवण्यात आल्याने स्थगित झालेल्या निवडणुका तसेच चालू वर्षात नव्याने निवडणुकीस पात्र होणाऱ्या संस्थांची तयारी सुरू करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत.या आदेशानुसार जिल्ह्यातील २५१ सहकारी संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने पार पडणार आहेत. यात जिल्हा पातळीवरील महत्त्वाची संस्था असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह विश्वासराव नाईक साखर कारखाना, मोहनराव शिंदे साखर कारखाना, काही सुतगिरण्या, विकास सोसायट्या आणि अन्य सहकारी संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निवडणुकीस पात्र असलेल्या संस्थांमध्ये ‘अ’ वर्गातील १०, ‘ब’ वर्गातील ५४, ‘क’ वर्गातील १२६ आणि ‘ड’ वर्गातील ६१ सहकारी संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील सहकार राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.जिल्हा बँकेची निवडणूक नोव्हेंबरमध्येसांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत डिसेंबर २०२६ मध्ये संपत आहे. त्यामुळे बँकेची निवडणूक नोव्हेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे वर्ष बँकेचे शताब्दी वर्ष असल्याने संचालक मंडळाने मागणी केल्यास राज्य शासन खास बाब म्हणून विद्यमान संचालकांना सहा महिन्यांची मुदतवाढ देऊ शकते. मात्र बँकेतील कारभारासंदर्भात सुरू असलेल्या चौकशा, नोकरभरतीला दिलेली स्थगिती आणि पालकमंत्र्यांसह काही सत्ताधारी आमदारांची बँकेकडे असलेली वक्रदृष्टी पाहता विद्यमान संचालकांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
‘राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवली आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवडणुकीसाठी पात्र असलेल्या २५१ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.’ - सुनील चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, सांगली.
Web Summary : Sangli's 251 cooperative societies, including key banks and factories, are gearing up for elections after a state-imposed stay was lifted. This decision has revitalized political activity in the cooperative sector, with phased elections expected to commence soon, impacting various levels of cooperative organizations.
Web Summary : सांगली में 251 सहकारी समितियों, जिनमें प्रमुख बैंक और कारखाने शामिल हैं, राज्य द्वारा लगाए गए रोक के बाद चुनाव के लिए तैयार हैं। इस फैसले ने सहकारी क्षेत्र में राजनीतिक गतिविधि को पुनर्जीवित कर दिया है, चरणबद्ध चुनावों के जल्द शुरू होने की उम्मीद है।