सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अनंतपूर येथे ८ सप्टेंबर रोजी होणारा प्रकट दिवसाचा कार्यक्रम पोलिसांच्या विनंतीवरून रद्द करण्यात आला आहे. रामपाल महाराजांविषयी कोणताही गैरसमज करून घेऊ नका. लोकांनीदेखील आमच्या गावाकडे येऊ नये, अशी विनंती अनंतपूर येथील तुकाराम इरकर यांनी केली आहे.अथणी तालुक्यातील अनंतपूर येथील पाचजणांसह एकूण २० भाविकांनी ८ सप्टेंबर रोजी देहत्यागाचा निर्णय घेतला होता. यासंबंधीची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस आणि तहसीलदारांनी तुकाराम इरकर यांचे प्रबोधन केले. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आहे.
तुकाराम इरकर यांनी एका चित्रफितीद्वारे लोकांना सांगितले की, सहा वर्षांपासून ते रामपाल महाराजांची भक्ती करतात. बिकट परिस्थितीतून ते बाहेर पडले आहेत. रामपाल महाराजांची आम्ही भक्ती करतो. आत्मशक्तीद्वारे ते प्रकट होतात असा आमचा विश्वास आहे.परंतु, आमच्या कुटुंबाविषयी गैरसमज पसरवला गेला आहे. मानवी शरीर सहजासहजी मिळत नाही. ८ सप्टेंबर रोजी आम्हाला सत्यलोकात घेऊन जातील, असा कोणताही प्रकार घडणार नाही. आम्ही हा प्रकट दिवसाचा कार्यक्रम थांबवला आहे. पोलिसांनीदेखील आम्हाला विनंती केली आहे. लोकांनी आमच्या गावाकडे, घराकडे येऊ नये. आमच्या घरात कोणतीही उपासना वगैरे सुरू नाही.दरम्यान, रामपाल महाराज यांच्या शिष्यांनीदेखील तथाकथित दावा खोटा असल्याचे निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. महाराजांनी त्यांच्या प्रवचनातून ‘जीवन हे परमेश्वराचे दान आहे. आत्महत्या ही पापकृती आहे, प्रत्येकाने सत्य, शांती व बंधुभावाने जीवन जगावे’, असा संदेश दिला आहे. त्यामुळे महाराजांविषयी गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन केले आहे.