अशोक डोंबाळेसांगली : दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचा खर्च १५ हजार ६४२ कोटींवर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत नऊ हजार २५५ कोटी रुपयांचा खर्च झाला असून, उर्वरित अपूर्ण कामांसाठी सहा हजार ३८७ कोटी रुपये निधीची गरज आहे.टेंभू योजनेला १९९५ मध्ये युती सरकारच्या कालावधीत मंजुरी मिळाली. या योजनेचा मूळ खर्च एक हजार ४१६ कोटी ५९ लाख रुपये अपेक्षित होता. योजनेला कृष्णा नदीतून २२.९० टीएमसी पाणी उचलण्याची मंजुरी होती. सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील ८० हजार हेक्टर लाभक्षेत्र होते. गेल्या ३० वर्षांत लाभक्षेत्रात ८८ हजार ८५० हेक्टर लाभक्षेत्र वाढून १ लाख ६८ हजार ८५० हेक्टर झाले आहे. लाभक्षेत्र वाढल्यामुळे शासनाकडून ८ टीएमसी जादा पाणी उचलण्यास मंजुरी मिळाली आहे. लाभक्षेत्र वाढल्यामुळे टेंभू योजनेचा खर्च गेल्या ३० वर्षांत आठ हजार २७२ कोटींवर पोहोचला आहे. आतापर्यंत या योजनेवर पाच हजार १३० कोटी रुपये खर्च करून कऱ्हाड, कडेगाव, खानापूर, खटाव, तासगाव, आटपाडी, सांगोला, कवठेमहांकाळ तालुक्यांतील एक लाख ११ हजार ८५७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सध्या या योजनेला तीन हजार २४५ कोटी रुपयांची गरज आहे.जिल्ह्यातील दुसरी मोठी योजना कृष्णा-कोयना म्हणजेच ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन योजना आहे. या योजनेचा शुभारंभ तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते १९८४-८५ मध्ये झाला आहे. त्यावेळी ८२ कोटींचा निधी मंजूर केला. ज्यामध्ये म्हैसाळ सिंचन योजनेसाठी २७ कोटींची तरतूद होती.पुढे म्हैसाळ सिंचन योजनेसाठी स्वतंत्र निधी मिळू लागला. दि. २७ मार्च १९८६ रोजी म्हैसाळ सिंचन योजनेच्या कामाचे स्वतंत्र उद्घाटन झाले. आता ४१ वर्षांनंतर सध्याच्या ताकारी-म्हैसाळ योजनेचा खर्च आठ हजार २७२ कोटींवर गेला आहे. यामध्ये जत पूर्व भागासाठीच्या सुधारित म्हैसाळ योजनेच्या खर्चाचाही समावेश आहे.
निधीअभावी कामे रखडली
- आतापर्यंत या योजनांवर पाच हजार १३० कोटी रुपयांचा खर्च झाला असून, एक लाख ६५ हजार ६४१ हेक्टरपैकी एक लाख १९ हजार ७६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांच्या अपूर्ण कामांसाठी तीन हजार १४२ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे.
- अपूर्ण कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळवण्यात राजकीय रेटा कमी पडत असल्यामुळे कामे सध्या ठप्प आहेत. शासनाकडून निधी वेळेत मिळत नसल्यामुळे ठेकेदारांनी कामे गतीने पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
टेंभू योजनेत ३३४ गावांचा समावेशतालुका - लाभार्थी गावे - सिंचन क्षेत्र हेक्टरमध्ये
- कराड - ३ - ६००
- माण - १९ - ५६८६
- खटाव - ३० - ७४४०
- कडेगाव - ३९ - ९३२५
- खानापूर - ६१ - २४६४६
- तासगाव - ४३ - १४५२६
- आटपाडी - ६० - २१२९४
- क.महांकाळ - ३४ - १२१२७
- जत - ०४ - २६३६
- सांगोला - ४१ - २३१९५