जत पावसाळ्यात तहानलेलाच

By Admin | Updated: October 9, 2015 22:49 IST2015-10-09T22:49:51+5:302015-10-09T22:49:51+5:30

माणसी २० लिटर पाणी : २४ गावे, २०५ वाड्या-वस्त्यांना ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा

That's the thirsty rainy season | जत पावसाळ्यात तहानलेलाच

जत पावसाळ्यात तहानलेलाच

जयवंत आदाटे- जत-तालुक्यातील २४ गावे व त्याखालील २०५ वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ८१ हजार नागरिकांना ३१ टँकरद्वारे ऐन पावसाळ्यातही माणसी २० लिटर याप्रमाणे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाळा संपत आला आहे. आता परतीचा पाऊस पडत आहे. तालुक्याच्या काही भागात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६३ मिलिमीटर असून आजअखेर २२६.८९ मि.मी. पावसाची नोंद येथे झाली आहे. सरासरी ४८ टक्के पाऊस तालुक्यात झाला आहे. एकही साठवण अथवा पाझर तलाव किंवा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. काही मोजक्याच तलावात पंधरा ते वीस टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच अद्याप काही तलाव कोरडे ठणठणीत आहेत.
आॅगस्टमध्ये तालुक्यातील ५४ गावात ४७ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस व शेवटी काही प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात सर्वत्र समान प्रमाणात हा पाऊस झालेला नाही. कुडणूर, व्हसपेठ, धुळकरवाडी, घोलेश्वर, काराजनगी, दरीकोणूर, सालेकिरी-पाच्छापूर, खंडनाळ, कुणीकोणूर, आवंढी, सिंगणहळ्ळी, लोहगाव, बाज, माडग्याळ, बिरनाळ या तेरा गावांतील सोळा टँकर शासनाने बंद केले आहेत. येथे अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढलेली नाही. पावसाचे पाणी विहिरीत, विंधन विहिरीत व तलावात काही प्रमाणात आले आहे. हे पाणी टिकून राहणार नाही. त्यामुळे शासनाने आमच्या गावातील पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद करू नयेत, अशी मागणी टँकर बंद करण्यात आलेल्या गावांतील नागरिकांनी केली आहे.
उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, उटगी, बिळूर, हळ्ळी, सुसलाद, बेवनूर, जाडरबोबलाद, सोन्याळ, माणिकनाळ, येळवी, अंतराळ, बसर्गी, निगडी खुर्द, गोंधळेवाडी, सोनलगी, मोरबगी, अंकलगी, बालगाव, लकडेवाडी या २४ गावात ३१ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
यापुढील कालावधित परतीचा पाऊस समाधानकारक झाला, तर प्रशासनाला टँकरच्या संख्येत वाढ करावी लागणार नाही.
पावसामुळे ज्या गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे, तेथील प्रत्यक्ष पाहणी करून टँकर बंद करण्यात आले आहेत. त्या गावातून परत टँकरची मागणी आल्यानंतर गावाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यकता असेल, तर तेथे तात्काळ टँकर सुरू केला जाणार आहे, असे जत पंचायत समिती गटविकास अधिकारी ओमराज गहाणे यांनी सांगितले.

किरकोळ पावसानंतर टँकर बंद
याबाबत जिल्हा परिषद सदस्या सुशिला व्हनमोरे व सुनंदा पाटील म्हणाल्या की, तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही. शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. किरकोळ पावसावरच रब्बी पेरण्या झाल्या आहेत. उन्हाळ्याप्रमाणे तालुक्यात वातावरण आहे. अत्यल्प पाऊस झाल्यानंतर शासनाने पाण्याचे टॅँकर बंद केले आहेत. परंतु या पावसामुळे विहीर अथवा विंधन विहिरीतील पाणी पातळीत वाढ झालेली नाही. टॅँँकर बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी पिऊन नागरिक व जनावरांना साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

Web Title: That's the thirsty rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.