अभय योजनेस थंडा प्रतिसाद
By Admin | Updated: June 30, 2015 00:19 IST2015-06-29T23:00:25+5:302015-06-30T00:19:14+5:30
शुक्रवारी बैठक : एलबीटी वसुलीस ३१ जुलैची मुदत

अभय योजनेस थंडा प्रतिसाद
सांगली : राज्य शासनाने थकित एलबीटीसाठी दंड व व्याज माफीसाठी अभय योजना लागू केली. पण या योजनेलाही सांगली महापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांनी थंडा प्रतिसाद दिला आहे. या योजनेचा लाभ ३१ जुलैपर्यंत घेता येणार आहे. त्यानंतर महापालिकेकडून एलबीटी वसुलीसाठी कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अभय योजनेबाबत महापालिकेच्यावतीने शुक्रवार दि. ३ जुलै रोजी सांगली व मिरजेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनाने थकित एलबीटीसाठी दंड व व्याज माफीची घोषणा केली आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत थकित असलेल्या व्यापाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत संपूर्ण कर भरल्यास, त्यांना व्याज व दंड माफ केला जाणार आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांना विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. पण सांगलीतील व्यापाऱ्यांनी अभय योजनेकडेही पाठ फिरविली आहे. जून महिन्यात आजअखेर केवळ पाच कोटी रुपयांचा एलबीटी वसूल झाला आहे. व्यापाऱ्यांचा थंडा प्रतिसाद पाहता, महापालिकेने अभय योजनेची माहिती देण्यासाठी शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले आहे. मिरजेत सकाळी साडेअकरा वाजता, तर सांगलीत साडेचार वाजता ही बैठक होणार आहे.
दरम्यान, एलबीटीविरोधी कृती समितीनेही अभय योजनेचा अर्ज भरून देण्याचे आवाहन केले आहे. मुदतीत अर्ज भरणाऱ्यांनाच दंड व व्याजमाफी मिळणार आहे. पालिका अधिकाऱ्यांनी विवरणपत्र भरण्यासाठी व्यापाऱ्यांना सहकार्य करावे, विनाकारण त्रास देण्याची भूमिका असू नये, अन्यथा नवा वाद होईल, असे समीर शहा यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
अभय योजनेच्या अटी
एलबीटीअंतर्गत नोंदणी अनिवार्य
३१ जुलैपर्यंत विवरणपत्र व कर भरणा बंधनकारक
योजनेचा लाभ घेतल्यानंतर न्यायालयात गेल्यास सवलती काढून घेणार
व्यापाऱ्यांनी दाखल अपील विनाशर्त मागे घेणे आवश्यक