सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना अडीच महिन्यांनी पाठ्यपुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:30 IST2021-08-24T04:30:56+5:302021-08-24T04:30:56+5:30
सांगली : कोरोनामुळे शाळा बंद असून, पाठ्यपुस्तकेच मिळाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. अडीच महिन्यांनंतर जिल्ह्यातील पहिली ते ...

सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना अडीच महिन्यांनी पाठ्यपुस्तके
सांगली : कोरोनामुळे शाळा बंद असून, पाठ्यपुस्तकेच मिळाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. अडीच महिन्यांनंतर जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या दोन लाख २७ हजार ५२६ विद्यार्थ्यांसाठी बारा लाख सहा हजार २३३ पुस्तकांच्या प्रती मिळाल्या आहेत. पलूस तालुका वगळता अन्य नऊ जिल्ह्यांना पुस्तके मिळाल्याचा दावा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळा दि. १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. मात्र थोड्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण चालू आहे. पन्नास टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबलेच आहे. घरातील पालकांनी मुलांना शिकवायचे म्हटले तर जिल्हा परिषदेकडून अडीच महिने झाले तरी पुस्तकांचे वाटपच झाले नाही. तथापि प्राथमिक शिक्षण विभागाच्या माहितीनुसार पुस्तकांचे तालुक्यांच्या ठिकाणी वाटप झाले आहे. तेथून शाळांना वाटप सुरू असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पुस्तके मिळालीच नाहीत, असे सांगितले.
चौकट
तालुकानिहाय विद्यार्थी संख्या, मिळालेली पाठ्यपुस्तके
तालुका विद्यार्थी संख्या मिळालेली पुस्तके
वाळवा ३८६७१ २१४४९४
आटपाडी १५०७९ ८१०९२
मिरज ३१३२३ १६९९८५
तासगाव २३६८९ १२६४५६
खानापूर १६१५० ८६४१९
शिराळा १४८५५ ८२७४५
क.महांकाळ १६२६७ ८४९५५
जत ४४३६३ २५४३८०
पलूस १४२४८ ३५७६९
कडेगाव २२७५२६ १२०६२३३
कोट
पलूस तालुक्याचा एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेत समावेश झालेला आहे. तेथील पहिली ते आठवीच्या १४ हजार २४८ विद्यार्थ्यांसाठी १३ हजार १५३ पाठ्यपुस्तक संच आठ दिवसांत मिळणार आहेत. उर्वरित नऊ तालुक्यांमध्ये पुस्तके मिळाली आहेत. सेमी इंग्रजीच्या पुस्तकांचेही वाटप झाले आहे.
संतोष ढवळे, कार्यक्रम अधिकारी, सर्व शिक्षा अभियान
कोट
अनेक शाळांमध्ये अद्याप पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. विद्यार्थी व पालकांकडून शिक्षकांकडे वारंवार मागणी होत आहे. रोज काय उत्तरे द्यायची, असा शिक्षकांना प्रश्न पडत आहे. शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पुस्तके त्वरित मिळावीत.
-बाबासाहेब लाड, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती.