दर उतरूनही ४७ वाळू प्लॉटकडे ठेकेदारांची पाठ
By Admin | Updated: April 3, 2015 23:58 IST2015-04-03T23:18:41+5:302015-04-03T23:58:15+5:30
प्रशासनाची चिंता : वाळूचे दर उतरले; कर्नाटकातून आवक

दर उतरूनही ४७ वाळू प्लॉटकडे ठेकेदारांची पाठ
अंजर अथणीकर - सांगली --जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ४७ वाळू प्लॉटच्या तिसऱ्यांदा काढलेल्या लिलावांनाही नगण्य प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे प्लॉटचे दर २५ टक्के कमी करुनही ठेकेदाराने यासाठी निविदा न भरल्याने प्लॉटचे लिलाव होऊ शकले नाहीत. यापूर्वीच चार प्लॉटचे लिलाव झाले असून तेथील उपसा सुरु आहे. सांगली जिल्ह्यात आता कर्नाटकातून भरमसाट वाळूची आवक सुरु झाल्याने वाळूचा दर आता सात हजार रुपयांवरुन साडेचार हजार रुपये ब्रास झाला आहे.
जिल्ह्यातील चार प्लॉटचे लिलाव पूर्ण झाले असून, त्यामधून आता उपसा सुरु झाला आहे. यामध्ये शिराळा तालुक्यातील शिराळा खुर्द, पुनवत व पलूस तालुक्यातील अंकलखोप व दह्यारीचा समावेश आहे. या चार प्लॉटमधून जिल्हा प्रशासनाला ८ कोटी ६४ लाख रुपये महसूल मिळाला आहे. जिल्ह्यातील उर्वरित ४७ वाळू प्लॉटचे (शासकीय) दर २५ टक्क्यांनी कमी केले आहेत. यामुळे सर्वसाधारणपणे एका प्लॉटचा दर ६० ते ७० लाख रुपयांनी कमी झाला आहे. दर कमी करून ई लिलाव काढण्यात आले. यासाठीही एकाही ठेकेदाराने निविदा भरली नाही. यामुळे हा लिलावही आता रद्द झाला.
राज्य शासनाने प्लॉटची व्याप्ती चार ते पाच कि.मी.पर्यंत वाढविली. त्यामुळे एकेका प्लॉटचा दर तब्बल दोन ते तीन कोटींपर्यंत गेला होता. आता त्यामध्ये ६० ते ७० लाख रुपये कमी करुनही प्लॉटला मागणी न झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आता वाळूचा तुटवडा निर्माण झाल्याने, कर्नाटकातून वाळूची आवक भरमसाट वाढली आहे. त्यामुळे वाळूचा दर सात हजार रुपयांवरुन साडेचार हजार रुपये झाला आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
वाळू स्वस्त; खडी, वीट महाग
कर्नाटकातून वाळूची आवक वाढल्याने वाळूचे दर आता ब्रासला सात हजारावरुन साडेचार हजार रुपये झाले आहेत. दुसरीकडे वीट व खडीचे दर मात्र वाढले आहेत. पाच हजार ४ इंची विटांचा दर गेल्या पंधरा दिवसात १९ हजार ५०० रुपयांवरुन २२ हजारावर गेला आहे. सहा इंची विटांचा दर वीस हजारावरुन २३ हजार रुपये झाला आहे. खडीचा दरही २ हजार २०० ते २ हजार ३०० रुपये ब्रास झाला आहे. पाचशे रुपयांनी दरवाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे विटांचे दर वाढले असल्याची माहिती उत्पादकांनी दिली.
नआयुक्तांशी सोमवारी चर्चा करणार
वाळू प्लॉटचे दर २५ टक्के कमी करुनही वाळू ठेकेदारांनी निविदा भरल्या नाहीत. यामुळे जिल्ह्यातील ४७ वाळू प्लॉट पडून आहेत. या प्लॉटच्या लिलावासाठी काय निर्णय घ्यायचा, यासंदर्भात विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याशी सोमवारी चर्चा करण्यात येणार आहे. त्यांना याचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात येणार आहे. त्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ४७ वाळू प्लॉटबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या प्लॉटमध्ये पुन्हा किमत कमी होण्याची शक्यता आहे.