डीएड, बीएड फायनलच्या विद्यार्थ्यांनाही टीईटी परीक्षा झाली खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:25 IST2021-08-29T04:25:57+5:302021-08-29T04:25:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : डीएड व बीएडच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही आता टीईटी परीक्षा देता येणार आहे. शासनाने ...

डीएड, बीएड फायनलच्या विद्यार्थ्यांनाही टीईटी परीक्षा झाली खुली
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : डीएड व बीएडच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही आता टीईटी परीक्षा देता येणार आहे. शासनाने तसा निर्णय नुकताच जाहीर केला. विद्यार्थ्यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.
१९ जानेवारी २०२० नंतर म्हणजे दीड वर्षांनी येत्या ऑक्टोबरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी ) होत आहे. शिक्षक म्हणून सेवेत रुजू होऊ इच्छिणाऱ्यांना परीक्षा पात्र होणे अनिवार्य आहे. त्याशिवाय 'शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन परीक्षा (टीएआयटी)' देता येणार नाही. टीईटी प्रमाणपत्राची वैधता सात वर्षांवरून आजीवन केलेली आहे, त्यामुळेही विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. डीएड आणि बीएडच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेची संधी द्यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. त्यावर सकारात्मक निर्णय झाला आहे.
बॉक्स
५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार
अर्ज भरण्याची मुदत ३ ते २५ ऑगस्ट होती. त्यामध्ये सुधारणा करत मुदत ५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. अनेक उमेदवारांना याचा लाभ मिळेल. परीक्षा १० ऑक्टोबरला सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत होईल. यूपीएससीची परीक्षाही याचदिवशी असल्याने काही परीक्षार्थ्यांची गोची होणार आहे. त्यामुळे टीईटी नंतर घेण्याची मागणी काहींनी केली आहे.
कोट
शासनाच्या निर्णयाचे स्वागत
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन परीक्षादेखील जुलै २०१७ पासून झालेली नाही. तीदेखील वर्षातून दोनदा व्हावी. त्यामुळे टीईटी पात्र उमेदवारांना वयोमर्यादा ओलांडण्यापर्वी परीक्षा देऊन सेवेत रुजू होता येईल. - प्रतिभा मगदुम, सांगली
प्रदीर्घ काळ अनेक भावी शिक्षक टीईटी परीक्षेची आतुरतेने वाट पाहत होते. शासनाने परीक्षेला हिरवा कंदील दिल्यानंतर लाखो उमेदवारांच्या नोकरीचे दरवाजे खुले झाले आहेत. निर्णयाचे स्वागत आहे. -
संकेत नायकवडी, सांगली.
पॉईंटर्स
डीएडच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी - ३६५
बीएड्च्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी - ७००