निष्ठा श्रेष्ठ की पैसा याचीच कसोटी...
By Admin | Updated: January 29, 2016 00:26 IST2016-01-28T23:56:28+5:302016-01-29T00:26:20+5:30
महापौर निवड : पदासाठी दाखविली जात आहेत प्रलोभने; इच्छुकांच्या लॉबिंगपुढे नेते झुकणार का?

निष्ठा श्रेष्ठ की पैसा याचीच कसोटी...
शीतल पाटील -- सांगली -महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी सत्ताधारी काँग्रेसमधील इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. येत्या १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखतींदरम्यान शर्यतीतील उमेदवाराचे नाव घेण्यासाठी नगरसेवकांना प्रलोभने दाखविली जात आहेत. केवळ नाव घेण्यासाठी लाखापासून बोली लावली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत पक्ष व नेत्यांवरील निष्ठा श्रेष्ठ की पैसा, याची कसोटी लागणार आहे. महापौर-उपमहापौर पदासाठी २ फेब्रुवारीरोजी सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. महापौर पदासाठी सत्ताधारी काँग्रेसमधून हारूण शिकलगार, सुरेश आवटी, राजेश नाईक, रोहिणी पाटील, विजय घाडगे, प्रशांत पाटील-मजलेकर, अलका पवार, बसवेश्वर सातपुते, अनारकली कुरणे इच्छुक आहेत. सोमवारी १ फेब्रुवारीरोजी काँग्रेस नगरसेवकांची बैठक होत आहे. या बैठकीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. महापौर निवडीचे सर्वाधिकार जयश्रीताई पाटील यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे महापौर पदाचा उमेदवार जयश्रीताईच ठरवतील. यापूर्वी महापौर, उपमहापौर पदापासून ते अगदी विषय समिती सदस्यांच्या निवडी मदनभाऊ पाटील यांच्या आदेशाने होत. त्यांचा शब्द पालिकेच्या राजकारणात कधीच डावलला गेला नाही. पण मदनभाऊंच्या पश्चात अनेक नगरसेवकांना पंख फुटले आहेत. त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. त्यातून काँग्रेसअंतर्गत गटबाजीला चांगलेच उधाण आले आहे. इच्छुक नगरसेवकांनी गटा-तटाचे राजकारण सुरू केले आहे. प्रलोभनांच्या जोरावर महापौरपदी विराजमान होण्याचे स्वप्न उराशी बाळगून फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. या प्रलोभनाला नवखे नगरसेवक बळी पडत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या राजकारणात पैशाचा खेळ पहिल्यांदात जोरात सुरू आहे. नेत्यांसमोर गटाचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी पैशाची बोली लावली जात आहे. फुटीच्या राजकारणात पक्षाला कोण महत्त्व देतो आणि कोण नाही, याची पुरती कल्पना असलेली काही नेतेमंडळी पालिकेबाहेरून सूत्रे हलवित आहेत. नगरसेवकांची पैशाची नस ओळखून त्यांच्याशी संधान साधले जात आहेत.
पैशाचा हा खेळ यापूर्वी कधी फारसा रंगला नव्हता. नेत्यावरील निष्ठा, या निकषावर बहुतांशवेळा पालिकेची सूत्रे नेत्यांनी नगरसेवकांच्या हाती दिली होती. मदनभाऊंनी तर अनेकदा समाजात बदनाम झालेल्यांनाही पदे दिली. कारण ते त्यांच्याशी एकनिष्ठ होते. त्यांच्यापायी अनेकदा मदनभाऊंना टीकेला सामोरे जावे लागले. पण आमची कातडी गेंड्याची आहे, असे म्हणत त्यांनी त्यांचा बचावही केला. पण आता परिस्थिती बदलली आहे. निष्ठेपेक्षा पैसा बोलू लागला आहे.
स्वकीयांचा चक्रव्यूह : धोक्याची घंटा
महापालिका क्षेत्रात मदन पाटील यांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. ते आमदार असोत अथवा नसोत, त्यांच्यामागे कार्यकर्त्यांची फौज मोठी होती. हीच ताकद आता जयश्रीतार्इंच्या पाठीशी आहे. त्यामुळे भविष्यात महापालिका क्षेत्राचे नेतृत्व जयश्रीतार्इंच्या हाती येणार, हे उघड आहे. पण काहींना ते रुचलेले नाही. आजपर्यंत पालिकेच्या राजकारणापासून दूर राहिलेली नेतेमंडळी सक्रिय झाली आहेत. त्यासाठी महापौर निवडणूक ही चांगली संधी आहे. काँग्रेस नगरसेवकांत फूट पाडून जयश्रीतार्इंना धक्का देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पूर्वी मदनभाऊंना स्वकीयांसह परकीयांनीही घेरले होते. आता जयश्रीतार्इंना स्वपक्षातील नेत्यांकडूनच त्रास सुरू झाला आहे. स्वकीयांचा हा राजकीय चक्रव्यूह जयश्रीताई कशा भेदतात, यावरच भविष्यातील वाटचाल निश्चित होणार आहे.
एकीकडे नगरसेवकांत पैशाचा बाजार सुरू असताना, इतर माध्यमातूनही जयश्रीतार्इंवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी इच्छुकांनी विविध क्लुप्त्याही आखल्या आहेत. वरिष्ठ पातळीवरूनही प्रयत्न सुरू झाले आहेत. अगदी घरातून महापौर पदासाठी लॉबिंग केले जात आहे. मदनभाऊंच्या पश्चात कांँग्रेस एकसंधपणे महापौर निवडीला सामोरी जाईल, असे बोलले जात होते. पण नगरसेवकांच्या महत्त्वाकांक्षेच्या एकसंधतेलाच तडा दिला आहे. त्यामुळे खऱ्याअर्थाने जयश्रीतार्इंची कसोटी लागणार आहे. त्या निष्ठेला महत्त्व देतात, की लॉबिंगपुढे झुकतात, हे दोन फेब्रुवारी रोजी स्पष्ट होईल.