जामदारांची नार्को चाचणी करा
By Admin | Updated: April 28, 2015 23:44 IST2015-04-28T22:42:33+5:302015-04-28T23:44:58+5:30
विवेक कांबळे : महापालिकेतील अनेक घोटाळे उघडकीस येतील

जामदारांची नार्को चाचणी करा
सांगली : महापालिकेचे गटनेते किशोर जामदार यांची नार्को चाचणी केल्यास अनेक घोटाळे उघडकीस येतील, असा पलटवार महापौर विवेक कांबळे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत केला. माजी महापौरांच्या काळात केलेल्या ऐनवेळच्या ठरावांचा पर्दाफाश करताना यात मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला असून, यामागे किशोर जामदारच मास्टरमार्इंड असल्याचा आरोप केला.
कांबळे म्हणाले की, महापौरपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वीच्या काळात महासभेत अनेक ऐनवेळचे ठराव झाले आहेत. यात अनेक गैरकारभार झाले आहेत. विश्रामबाग चौकातील एका नाष्टा सेंटरची ९ वर्षाची मुदत संपल्यानंतर २९ वर्षाच्या भाडेपट्टीने जागा दिली आहे. त्यासाठी वर्षाकाठी १४७६० रुपये भाडे आकारले आहे. या मालकाने तिथे लॉन तयार केली आहे. त्याला परवानगी घेतलेली नाही. माजी नगरसेवकाच्या भूखंडाला नुकसानभरपाई देण्याचा विषयही वादग्रस्तच आहे. या ठरावावर किशोर जामदार व संजय मेंढे यांच्या सह्या आहेत. हा ठराव विखंडित करण्याची मागणी केली आहे. जैव भस्मीकरणचा ठेका मेडिकल असोसिएशनला देण्यात आला आहे. या ठेक्यातही पदाधिकाऱ्यांनी आपल्या बगलबच्च्यांची सोय केली आहे. त्याला किशोर जामदार व विजय घाडगे सूचक, अनुमोदनआहेत. याबाबत प्रदूषण मंडळाकडे भस्मीकरण केंद्र ताब्यात घेण्याविषयी पत्र देणार आहोत. मिरज स्मशानभूमी, सिंधी मार्केटच्या भाडेपट्टीचा ठरावही ऐनवेळी घेतला आहे. या सर्व ठरावांमागे किशोर जामदारच आहेत. त्यांची नार्को चाचणी केल्यास अनेक घोटाळे बाहेर पडतील, असा टोलाही त्यांनी लगाविला.
महापौर म्हणून आपण चांगले काम करीत असताना नगरसेवकांत गैरसमज पसरवून बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले आहे. जामदारांच्या कारभाराबाबत अनेक नगरसेवक अनभिज्ञ आहेत. पण ज्या गावच्या बाभळी, त्यागावच्या बोरी याप्रमाणे आपणाला त्यांचा कारभार चांगलाच माहीत आहे. सायंकाळी सहानंतर पालिकेत होणारा रात्रीचा खेळ आपण थांबविला आहे. त्यामुळेच त्यांची ओरड सुरू आहे. ज्या नेत्यांनी मला खुर्चीवर बसविले, त्यांनी एका शब्दानेही विचारलेले नाही. माझा कारभार पारदर्शी असल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)