अंत्यविधीच्या जागेवरून देवराष्ट्रेत तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:53+5:302021-05-31T04:20:53+5:30
देवराष्ट्रे गावात अनेक समाजाच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी व दफनभूमी आहेत. लिंगायत समाजाच्या दफनभूमीत समाजाची दोन गुंठे जागा आहे. मागील अनेक ...

अंत्यविधीच्या जागेवरून देवराष्ट्रेत तणाव
देवराष्ट्रे गावात अनेक समाजाच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी व दफनभूमी आहेत. लिंगायत समाजाच्या दफनभूमीत समाजाची दोन गुंठे जागा आहे.
मागील अनेक वर्षांपासून येथे अंत्यविधी केले जातात; मात्र या क्षेत्राला लागून असलेल्या शेतकऱ्यांनी ही जागा आपलीच असल्याचा दावा करीत शनिवारी या जागेचे सपाटीकरण केले आहे. रविवारी पहाटे गावातील लिंगायत समाजातील महिलेचे निधन झाले. त्यामुळे अंत्यविधी कोठे करायचा, असा प्रश्न निर्माण झाला. समाजातील काहींनी ही बाब तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सांगितली. यानंतर गावातील पदाधिकारी, पोलीस, ग्रामविकास अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले. त्यांनी तोडगा काढायचा प्रयत्न केला. मात्र तोडगा निघत नसल्यामुळे चिंचणीचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी आले. त्यांनी दोन्हीकडील लोकांचे म्हणणे ऐकून घेतले व मृत महिलेचा दफनविधी या जागेत करावा, अशी विनंती केली. तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन ग्रामपंचायतीने मोजणी मागवायची, असा तोडगा त्यांनी काढला. यावर समझोता झाला व दफनविधी पार पडला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.