निकालानंतर हाणामारीने मिरजेत तणाव
By Admin | Updated: March 7, 2015 00:00 IST2015-03-06T23:58:36+5:302015-03-07T00:00:49+5:30
मिरज सोसायटीत सत्तांतर : जामदार गटाचा कुरणे गटावर विजय; विरोधकांच्या आठ सदस्यांची निवड

निकालानंतर हाणामारीने मिरजेत तणाव
मिरज : मिरजेत ग्रुप सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी कुरणे गटावर जामदार गटाने मात केली. चुरशीने झालेल्या या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे पाच व विरोधी गटाचे आठ सदस्य निवडून आल्याने तब्बल ३५ वर्षांनंतर सोसायटीत सत्तांतर झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर बुधवार पेठ परिसरात कुरणे व जामदार समर्थक भिडल्याने दोन गटात मारामारीच्या घटना घडल्या. यामुळे बुधवार पेठ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिरज ग्रुप सोसायटीत ३५ वर्षे कुरणे गटाची सत्ता होती. सोसायटी निवडणुकीच्या निमित्ताने महापालिकेतील सत्ताधारी व विरोधक परस्परांच्या विरोधात आमने-सामने होते. सोसायटीतील सत्ताधारी बाळासाहेब कुरणे, महादेव कुरणे यांना किशोर जामदार, सुरेश आवटी, संजय मेंढे यांनी आव्हान दिले होते. सोसायटीच्या प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या विरोधात केवळ तीन ते चार उमेदवार असत. मात्र यावेळी सत्ताधारी गटाने पाच सदस्यांना डावलल्याने सत्ताधाऱ्यांविरोधात असलेल्या रोषाचा विरोधी गटाला फायदा मिळाला. सत्ताधारी शेतकरी विकास पॅनेलविरोधात माजी महापौर किशोर जामदार, स्थायी समिती सभापती संजय मेंढे, सुरेश आवटी, शेतकरी संघटनेचे महादेव कोरे, संभाजी मेंढे, राष्ट्रवादीचे अभिजित हारगे, चंद्रकांत हुलवान यांनी परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व करीत जोरदार प्रचार केला. सत्ताधारी शेतकरी विकास पॅनेलला इद्रिस नायकवडी, शिवसेनेचे तानाजी सातपुते, माजी महापौर विजय धुळूबुळू यांचा पाठिंबा होता. महापालिकेतील सत्ताधारी व विरोधक सोसायटी निवडणुकीच्या निमित्ताने परस्परांच्या विरोधात प्रचारात सहभागी होते. सुमारे दीड हजार मतदार असलेल्या सोसायटी निवडणुकीत महापालिका निवडणुकीनंतर सोसायटी निवडणुकीतही कुरणे गटाला धोबीपछाड दिला आहे. निवडणुकीत सत्ताधारी कुरणे गटाचे विनायक कुरणे, तानाजी सातपुते, डॉ. महादेव म्हेत्रे, सुभाष पाटील, वनिता केसरखाने, तर जामदार गटाचे संभाजी मेंढे, अण्णासाहेब हारगे, अनिल हारगे, वसंत मंडले, अलिअसगर पिरजादे, दीपक जामदार, भीमराव हुलवान, सुवर्णा कोरे हे आठ सदस्य विजयी झाले.
निवडणूक निकालानंतर जामदार समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत २५ ते ३० मताधिक्याने उमेदवार विजयी झाले. निवडणूक निकालानंतर बुधवार पेठ व ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात कुरणे व हारगे गटात मारामारीच्या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस ठाण्यात तडजोडीने प्रकरण मिटविण्यात आले. त्यामुळे याबाबत कोणतीही नोंद झाली नाही. (वार्ताहर)