तासगावात दहा लाखांची रोकड लंपास गाडीची काच फोडली :
By Admin | Updated: September 10, 2014 00:28 IST2014-09-09T23:59:17+5:302014-09-10T00:28:06+5:30
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला फटका; बँकेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

तासगावात दहा लाखांची रोकड लंपास गाडीची काच फोडली :
तासगाव : तासगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात लावण्यात आलेल्या मोटारीची काच फोडून १० लाखांची रोकड लंपास केल्याची घटना आज, मंगळवारी घडली. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक हणमंत विनायक कुलकर्णी यांची ही रोकड असून, त्यांनी ती घटनेच्या काही वेळापूर्वीच बँकेतून काढली होती. दुपारी सव्वादोनच्या दरम्यान हा प्रकार घडला. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत दोघा अनोळखी तरुणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कुलकर्णी यांचे चिरंजीव महेंद्र यांनी तासगाव पोलिसांत याबाबतची फिर्याद दिली. सेवानिवृत्तीनंतर हणमंत कुलकर्णी यांचे फंड व ग्रॅच्युईटीची रक्कम स्टेट बँक आॅफ इंडियाच्या येथील काशीपुरा गल्ली शाखेत जमा झाली होती. आज सकाळी त्यांनी दहा लाखांची रक्कम बँकेतून काढली. पाचशेच्या १०० नोटा असलेली २० बंडल होती. हे पैसे काळ्या रंगाच्या कापडी पिशवीत ठेवून मोटारीच्या पाठीमागील सीटवर पिशवी ठेवली. गाडीत त्यांच्या पत्नी, संध्या, मुलगा महेंद्र व सून हेही होते. नंतर त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात कोयना अपार्टमेंट या पोलीस वसाहतीबाहेर गाडी उभी केली. पैशाची पिशवी तशीच गाडीत ठेवली होती. गाडीचे दरवाजे लॉक करून ते पोलीस वसाहतीत परिचितांकडे गेले. त्यानंतर दुपारी दोनच्या दरम्यान ते सतीश लाटणे यांच्या घरी गेले. १५ मिनिटांनी त्यांचा मुलगा महेंद्र गाडीजवळ आल्यानंतर गाडीची मागील काच फुटलेली दिसली. पैशाची पिशवीही गाडीत नव्हती. महेंद्र यांनी घटनेची माहिती हणमंत कुलकर्णी यांना दिली. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांना कळविण्यात आले. याबाबत काही अंतरावर उभ्या असणाऱ्या महिलांना विचारले असता, दोघे तरुण गाडीजवळ उभे होते, नंतर ते दर्ग्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. (पान १२ वर)