पाणी कनेक्शनसाठी दहा हजार!
By Admin | Updated: April 24, 2015 01:16 IST2015-04-24T01:15:08+5:302015-04-24T01:16:30+5:30
स्थायी समिती सभेत आरोप : प्लंबर एजन्सीचा प्रस्ताव फेटाळला

पाणी कनेक्शनसाठी दहा हजार!
सांगली : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील खाबूगिरीचा गुरुवारी स्थायी समिती सभेत सदस्यांनी पर्दाफाश केला. राष्ट्रवादीचे विष्णू माने, शेडजी मोहिते या सदस्यांनी पाणी कनेक्शनसाठी दोन हजार रुपये खर्च येत असताना, चार हजारांपासून दहा हजारांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. नागरिकांची लूट सुरू असताना सत्ताधारी मात्र डोळे झाकून गप्प असल्याचा आरोप केला. प्लंबिंगच्या कामासाठी एजन्सी नियुक्त करण्याचा डावही त्यांनी हाणून पाडला.
सभापती संजय मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. या सभेत पाणीपुरवठा विभागाकडील प्लंबिंगच्या कामासाठी एजन्सी नियुक्त करण्याचा विषय प्रशासनाने चर्चेसाठी आणला होता. त्याला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध केला. विष्णू माने म्हणाले की, पाणी कनेक्शनसाठी डिपॉझिट ७५० रुपये, मीटर ८५० रुपये, खुदाई १५० व इतर खर्च, असे सुमारे दोन हजार रुपये नागरिकांना मोजावे लागतात. परंतु, पाणीपुरवठा विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून चार हजारांपासून दहा हजारांपर्यंत पैसे उकळले जातात. त्यात पुन्हा एजन्सी नियुक्त केल्यास प्लंबिंगच्या कामातून खाबूगिरी वाढणार आहे. पाणीपुरवठ्याच्या कारभारावर सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण नाही. पाणीपुरवठ्याची यंत्रणा विस्कळीत झाली आहे. केवळ देव-घेवीचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. प्लंबिंग एजन्सीचा विषयही त्यांनी हाणून पाडला.
मिरजेत पंढरपूर रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूलसमोरील नाल्यात एका बिल्डरने अपार्टमेंटचे काम सुरू केले आहे. त्याबाबत शिवाजी दुर्वे यांनी प्रश्न उपस्थित केला.
सभापती मेंढे यांनी तातडीने स्थळ पाहणी करून, बिल्डरला चुकीच्या पद्धतीने परवाना दिला असेल, तर तो रद्द करण्याची सूचना सहायक आयुक्तांना केली. दिवाबत्ती साहित्य पुरवठ्याची ८४ लाखांची निविदा मंजूर केली आहे; पण ठेकेदारांकडून साहित्यपुरवठा होत नाही. आठ दिवसांपेक्षा अधिक काळ शहर अंधारात आहे, असे माने यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सफाईव्यतिरिक्त अन्य ठिकाणी काम करणाऱ्या मानधनावरील २३ कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचे आदेशही सभापतींनी दिले.