दहा हजार सांगलीकर म्हणतात, कोणताच उमेदवार पसंत नाही...
By Admin | Updated: October 23, 2014 00:07 IST2014-10-22T22:18:40+5:302014-10-23T00:07:12+5:30
विधानसभा निवडणूक : ‘नोटा’ मताचा सर्वाधिक वापर, प्रत्येक मतदारसंघात लोकांनी नोंदविला नकाराधिकार--लोकमत विशेष

दहा हजार सांगलीकर म्हणतात, कोणताच उमेदवार पसंत नाही...
अंजर अथणीकर - सांगली -निवडणूक रिंगणातील कोणताही उमेदवार पसंत नाही म्हणून नकाराधिकार (नोटा) वापरण्याची सोय विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच करण्यात आली होती. सांगली जिल्ह्यात याचा वापर तब्बल दहा हजार मतदारांनी केला आहे. या दहा हजार मतदारांना एकही उमेदवार अवडला नाही. यामुळे सर्वच पक्षांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. या अधिकाराचा सर्वाधिक वापर मिरज मतदारसंघात, तर कमी वापर पलूस-कडेगाव मतदारसंघात झाला आहे.
लोकसभा निवडणुकीपासून मतदारांना नकारात्मक मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मतदान यंत्रावर (ईव्हीएम) सर्वात शेवटी याचे चिन्ह ठेवण्यात आले होते. वरून सर्व उमेदवारांची पाहणी करून यामधील कोणीही आवडले नाही तर शेवटी मतदारांसाठी ‘नोटा’ मतदानाचा पर्याय मतदारांना देण्यात आला होता. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात ‘नोटा’चा अधिकार ९ हजार ७३८ मतदारांनी वापरला आहे. या मतदारांना एकही उमेदवार पसंत पडलेला नाही. एवढ्या मोठ्याप्रमाणात नकाराधिकाराचा वापर झाल्याने राजकीय पक्षांना धक्का बसला आहे.
प्रत्येक मतदारसंघात हजार ते दोन हजारपर्यंत मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला आहे. लोकसभा निवडणुकीत सुमारे दीड हजार मतदारांनी संपूर्ण जिल्ह्यात ‘नोटा’चा वापर केला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र मोठ्याप्रमाणात याचा वापर झाल्याने राजकीय पक्षांवर आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. राजकीय पक्षांनी चांगला उमेदवार दिला असता, तर नोटाचा वापर करण्याची वेळ मतदारांवर आली नसती.
‘नोटा’चा सर्वाधिक वापर झाला असला, तरी सध्या तरी त्याचा काहीच परिणाम होणार नाही. राजकीय पक्षांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठीच याचा उपयोग होणार आहे. ‘नोटा’च्या वापराला काही राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला होता. हा अधिकार नको, असे त्यांचे म्हणणे होते; मात्र काही मतदारांना कोणताच उमेदवार पसंत नाही, त्यांनी काय करायचे? त्यांनी आपले मत कसे व्यक्त करायचे, असा लढा दिल्यानंतर निवडणूक आयोगाने ‘नोटा’चा अधिकार मतदारांना दिला आहे. याचे प्रमाण वाढल्यास भविष्यात याचा सर्वच पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.