मिरज पश्चिम भागात दहा हजार एकर शेतीला महापुराचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST2021-07-27T04:27:55+5:302021-07-27T04:27:55+5:30
कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भागातील कृष्णा व वारणा नदीचा महापूर अजूनही ओसरला नाही. त्यामुळे सुमारे दहा हजार एकरांवरील ...

मिरज पश्चिम भागात दहा हजार एकर शेतीला महापुराचा फटका
कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भागातील कृष्णा व वारणा नदीचा महापूर अजूनही ओसरला नाही. त्यामुळे सुमारे दहा हजार एकरांवरील पिके चार-पाच दिवस पाण्यातच आहेत. यावर्षी जाणारा ऊस, नवीन आडसाली लागणी, सोयाबीन, हळद या नगदी पिकांसह भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
कृष्णा नदीच्या पात्रात अद्याप मोठ्या प्रमाणात पाणी आहे. साधारणपणे २० ते २५ फूट उंचीची झळ पिकांना बसत आहे. कृष्णाकाठच्या कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, तुंग, पद्माळे आदी गावांसह वारणा नदीकाठालाही महापुराचा मोठा फटका बसला आहे. समडोळी, कवठेपिराण, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी या ठिकाणी वारणा नदीच्या पुराचा फटका बसला आहे
२०१९ चा महापूर त्यानंतर २०२० पासून कोरोना आणि २०२१ साली काेराेनासाेबतच महापूर अशा काेंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. परिसरात यावर्षी सुमारे तीन हजार एकरांवर गळीतास जाणारा ऊस आहे. यावेळी पाऊस लवकर पडल्याने आडसाली ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याचप्रमाणे सुमारे दोन हजार एकर क्षेत्रांवर सोयाबीन, भुईमूग यासारखी खरीप पिके आहेत. त्याप्रमाणे ढब्बू मिरची, वांगी अशी भाजीपाला पिके आहेत. महापुरामुळे या सर्व पिकांची मोठी हानी झाली आहे. ऊस, सोयाबीन, हळद, भाजीपाला कुजून खराब होत आहेत. त्यामुळे पिके वाढविण्यासाठी केलेली मेहनत, खते, मशागत, औषधे यांचा खर्च वाया गेला आहे. कोट्यवधी रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
260721\img-20210726-wa0040.jpg
महापुराचा फटका बसलेली पिके