महापालिकेच्या दहा विद्यार्थ्यांनी बनविला लघुउपग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:40+5:302021-02-05T07:30:40+5:30
महापालिकेच्या शाळेतील दहा विद्यार्थ्यांनी लघुउपग्रह बनविला आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउण्डेशनतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

महापालिकेच्या दहा विद्यार्थ्यांनी बनविला लघुउपग्रह
महापालिकेच्या शाळेतील दहा विद्यार्थ्यांनी लघुउपग्रह बनविला आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउण्डेशनतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच अवकाश तंत्रज्ञानाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यासाठी, बौद्धिक विकास घडविण्यासाठी व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी या स्पर्धा पार पडल्या. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. देशातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांकडून १०० लघुउपग्रह तयार करून अवकाशात सोडण्यात येणार आहेत. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील पाच शाळांमधील दहा विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सेमिनार पूर्ण झाल्यानंतर १९ जानेवारी रोजी उपग्रह निर्मिती कार्यशाळा पुणे येथे पार पडली. कार्यशाळेत तयार झालेल्या सर्व शंभर लघुउपग्रहांचे ७ फेब्रुवारी रोजी रामेश्वरम येथून अवकाशात प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या उपग्रहांचे वजन २५ ते ८० ग्रॅम असून, हे उपग्रह हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपित करून ३५ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर स्थिर करण्यात येणार आहेत.
या दहा जणांचा सहभाग...
या उपक्रमात महापालिका क्षेत्रातील लखन हाके, ओंकार मगदूम, किशोरी मादीग, प्रतीक्षा मुडशी, योगेश कुरवलकर, दर्शन बुरांडे, साकिब सय्यद, समीर शेख, विजय हिरेमठ, राजू भंडारी हे विद्यार्थी सहभागी होते. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनीही गुणवत्ता सिद्ध केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.