मिरजेत अंत्यविधी साहित्यात दहा लाखांचा गोलमाल
By Admin | Updated: March 6, 2015 00:53 IST2015-03-06T00:47:00+5:302015-03-06T00:53:36+5:30
ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

मिरजेत अंत्यविधी साहित्यात दहा लाखांचा गोलमाल
सांगली : मिरजेच्या कृष्णाघाट स्मशानभूमीतील अंत्यविधी साहित्यामधील भ्रष्टाचाराचा खुद्द महापौर विवेक कांबळे यांनीच गुरुवारी पत्रकार बैठकीत पर्दाफाश केला. ठेकेदारांकडून करारपत्रानुसार साहित्याचा पुरवठा होत नसून वर्षभरात सुमारे दहा लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत, ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले.
महापौर विवेक कांबळे, नगरसेवक सुरेश आवटी, माजी नगरसेवक आनंदा देवमाने, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक किशोर गोंधळेकर यांनी गुरुवारी दुपारी एक वाजता मिरजेतील कृष्णाघाट स्मशानभूमीला भेट दिली. त्यानंतर पत्रकार बैठकीत त्यांनी अंत्यविधी साहित्यात भ्रष्टाचार होत असल्याचे सांगत बॉम्ब टाकला.
कांबळे म्हणाले की, मिरजेतील अंत्यविधी साहित्य पुरवठ्याचा ठेका भुजगौंडा उदगावे या ठेकेदाराला दिला आहे. त्याने ठेक्यातील अटी व शर्तींचे पालन केलेले नाही. स्मशानभूमीच्या दर्शनी भागात साहित्य तपशिलाचा फलक लावलेला नाही. करारपत्रानुसार एका मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी तीन क्विंटल लाकूड, तीन लिटर रॉकेल, चार मीटर कापड, तिरडीसाठी दोन काठ्या, दोन मडकी, दोन किलो मीठ, कापूर डबी व सुतळी आदी साहित्य देणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्याला एका मृतदेहामागे २१५० रुपये पालिकेकडून अदा केले जातात. या ठेकेदाराकडून केवळ तीन क्विंटल लाकूड व एक लिटर रॉकेल आदी साहित्याचाच पुरवठा होतो. त्यावर केवळ ८७० रुपये खर्च होत असून प्रत्येक मृतदेहामागे १२२० रुपयांची बचत ठेकेदार करीत आहे, पण पालिकेकडून मात्र तो पूर्ण रक्कम उचलतो.
वर्षभरात ठेकेदाराने सुमारे दहा लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या सर्व प्रकाराला आरोग्य विभागाकडील अधिकारीही जबाबदार आहेत. त्यांच्या संगनमताशिवाय हा प्रकार घडणे अशक्य आहे. त्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपायुक्तांना दिले आहेत. अंत्यविधी साहित्य पुरवठ्याची चौकशी करून, दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल.
पालिकेला झालेल्या नुकसानीची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच संबंधित ठेकेदाराचे बिल थांबविण्याची सूचना दिल्याचे कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)