मोरणा उपसा बंदीस तात्पुरती स्थगिती
By Admin | Updated: January 15, 2016 00:19 IST2016-01-14T23:39:40+5:302016-01-15T00:19:24+5:30
शिराळ्यात आनंदोत्सव : शेतकऱ्यांच्या आंदोलनास यश

मोरणा उपसा बंदीस तात्पुरती स्थगिती
शिराळा/सागाव : मोरणा धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी, पाण्याची उपसाबंदी तातडीने उठवावी, या प्रमुख मागणीसाठी शिराळा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनास राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने उपसाबंदी आदेशाला स्थगिती दिली आहे.
२०११ च्या शासनाच्या आदेशानुसार पाणी वापराचा पहिला हक्क पिण्यासाठी, नंतर शेतीसाठी व शेवटी उद्योगासाठी असताना, या नियमांचे उल्लंघन शासनाने केले आहे. शेतकरी वाकुर्डे योजनेचे वीज बिल भरत आहेत, मात्र उद्योजकच पाणी वापरत आहेत. त्यांच्याकडूनही वाकुर्डे योजनेच्या पाणी वापराचे वीज बिल घेण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आंदोलकांशी चर्चा करून प्रशासनाने मोरणा धरण लाभक्षेत्रातील पाणी उपसाबंदी उठविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
सत्यजित देशमुख यांनी, पाण्यावर पहिला हक्क श्ेतकऱ्यांचा आहे. पाणी कमी पडल्याने याठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. शासनाने डोळ्यास पट्टी बांधली आहे. त्यांना दुष्काळ दिसत नाही, असे सांगितले.
यावेळी बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील, ‘विराज’चे उपाध्यक्ष अशोकराव पाटील, भानुदास पाटील, आंदोलनकर्ते अशोक पाटील, बाळासाहेब पाटील, अशोक पांडू पाटील, रमेश पाटील, मोहन पाटील, शिवाजी राऊत, बाळासाहेब पाटील, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील, संचालक प्रदीप कदम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
कारखाने बंद ठेवू
माजी आमदार नाईक यांनी सांगितले की, पिके वाळू लागली आहेत. पिण्यास पाणी कमी आहे. मात्र कारखानदारांना पाणी चालू आहे. यामुळे प्रथम शेतकऱ्यांना पाणी द्या. जर पाणी कमी पडत असेल तर आम्ही कारखाने बंद ठेवू, असे त्यांनी स्पष्ट केले.