‘टेंभू’, विकासकामे प्रचारात कळीचा मुद्दा
By Admin | Updated: November 15, 2016 23:46 IST2016-11-15T23:46:26+5:302016-11-15T23:46:26+5:30
यशवंत साखर कारखानाही टार्गेट : सत्ताधारी मांडणार प्रचारात विकासाचा लेखाजोखा

‘टेंभू’, विकासकामे प्रचारात कळीचा मुद्दा
दिलीप मोहिते ल्ल विटा
सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या विटा पालिकेच्या निवडणुकीचे वादळ उठले आहे. गेल्या चाळीस वर्षांत एकहाती सत्ता ठेवणारे कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. सदाशिवराव पाटील विरुध्द शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांच्या गटात प्रमुख लढत होत आहे. प्रचारात चांगलाच रंग भरू लागला आहे. शिवसेनेकडून ढवळेश्वर तलावात सोडलेले टेंभूचे पाणी, धनशक्ती व घराणेशाही तसेच सत्ताधारी कॉँग्रेसकडून लिलावात निघालेला नागेवाडीचा यशवंत साखर कारखाना आणि विकासकामे हा प्रचारात कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या विटा पालिकेवर असलेल्या कॉँग्रेसच्या सत्तेला सुरूंग लावून सत्तांतर करण्यासाठी आ. बाबर यांचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला विटा शहरात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा कॉँग्रेसचे नेते व कार्यकर्ते विटेकरांसमोर मांडताना दिसत आहेत. दि. १० नोव्हेंबरला टेंभूच्या माहुली पंपगृह टप्पा क्र. ३ ब मधील पंप सुरू करून खानापूर-तासगाव कालव्यातून टेंभूचे पाणी विटा शहरानजीकच्या ढवळेश्वर तलावात सोडण्यात आले आहे.
त्यामुळे या निवडणुकीत आता ढवळेश्वर तलावात सोडण्यात आलेले टेंभूचे पाणी शिवसेनेच्या प्रचाराचा प्रभावी मुद्दा समजला जातो.
विरोधी शिवसेनेकडून सत्ताधारी मंडळींविरूध्द धनशक्ती आणि घराणेशाहीचा मुद्दाही प्रचारात मांडला जाण्याची शक्यता आहे, तर सत्ताधारी कॉँग्रेसकडून विरोधी शिवसेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न प्रभावीपणे आणि तितक्याच आक्रमकपणे केला जाण्याचे संकेत आहेत.
सत्ताधारी कॉँग्रेसकडून नागेवाडीचा यशवंत कारखाना, गेल्या दोन वर्षात विद्यमान आमदार बाबर यांनी शहराच्या विकासासाठी किती निधी आणला, याबरोबरच शिवसेनेच्या नेत्यांची केवळ शहरातील गट जिवंत ठेवण्यासाठीची धडपड, हे मुद्दे आक्रमकपणे मांडले जातील. गेल्या अनेक वर्षापासून विटा शहरात केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखाही यावेळी कॉँग्रेस प्रचारात प्रभावीपणे मांडणार आहे.
शहरात सध्या पदयात्रा सुरू असून प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी थेट संवाद साधला जात आहे. मात्र, कोपरा सभा किंवा जाहीर सभा ज्यावेळी सुरू होतील, त्यावेळी कॉँग्रेस विरोधी शिवसेना पक्षाच्या नेत्यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होतील. मात्र, विटा पालिका निवडणुकीच्या राजकीय पटलावर यावेळी टेंभूचे पाणी, घराणेशाही, बंद पडलेला यशवंत कारखाना, विविध विकास कामे आदी प्रश्न कळीचा मुद्दा होतील.
विटा पालिका : लक्षवेधी लढती
काही प्रभागात काँग्रेस विरूध्द शिवसेना असा थेट दुरंगी सामना होत आहे. प्रभाग २ ब मधून कॉँग्रेसचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील विरूध्द आ. बाबर यांचे चिरंजीव अमोल बाबर यांच्यात लढत होत आहे. प्रभाग क्र. ८ ब मध्ये कॉँग्रेसचे अशोकराव गायकवाड यांचे पुतणे सुमित गायकवाड आणि शिवसेनेचे अमर शितोळे यांच्यात सामना होत आहे. प्रभाग क्र. ९ ब मध्ये अशोकभाऊंचे चिरंजीव अॅड. अजित गायकवाड हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंंगणात उतरले असून त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार अनिल हराळे यांनी त्यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे. प्रभाग क्र. ६ ब मध्ये माजी आ. पाटील यांचे पुतणे पृथ्वीराज पाटील विरुध्द शिवसेनेचे मिलिंद कदम, तर प्रभाग क्र. ११ ब मधून माजी आ. पाटील यांचे पुतणे पद्मसिंह पाटील यांच्याविरूध्द शिवसेनेचे समीर कदम निवडणुकीच्या रिंंगणात आहेत.
प्रतिष्ठा लागली पणाला
विटा नगरपालिका सत्ताधारी गटाचे नेते माजी आ. सदाशिवराव पाटील व अशोकराव गायकवाड कॉँग्रेस-विकास आघाडीचे, तर शिवसेना-भाजप युतीचे नेतृत्व आ. अनिल बाबर करीत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी कॉँग्रेसमधून माजी आ. पाटील यांच्या स्नुषा सौ. प्रतिभा पाटील व विरोधी शिवसेना गटातून आ. बाबर यांच्या स्नुषा सौ. शीतल बाबर रिंंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या पदासाठी चुरस वाढली आहे. निवडणूक आजी व माजी आमदारांच्या प्रतिष्ठेची झाली आहे.