‘टेंभू’ कोणा एकट्याची जहागिरी नव्हे
By Admin | Updated: October 22, 2015 00:52 IST2015-10-22T00:31:55+5:302015-10-22T00:52:36+5:30
वैभव पाटील : संपतराव देशमुखच ‘टेंभू’चे खरे जनक

‘टेंभू’ कोणा एकट्याची जहागिरी नव्हे
विटा : टेंभू उपसा योजना ही खानापूर मतदार संघातील प्रत्येक नागरिकाच्या जिव्हाळ्याची व महत्त्वाकांक्षी योजना आहे. उगीच कोणी तरी ‘टेंभू’चे जे काय आहे ते मला एकट्यालाच सगळे कळते आणि योजना चालू आहे ती माझ्यामुळेच, अशा संभ्रमात कोणी राहू नये व त्यावर कोणी हुकूमशाही पध्दतीने मतही व्यक्त करू नये. कारण ती कुणा एकट्या घरची जहागिरी नाही, अशी टीका विट्याचे नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांच्यावर केली.
नगराध्यक्ष अॅड. पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षाच्या काळात आम्ही ‘टेंभू’साठी जे काही प्रयत्न केले व त्यासाठी जो लढा उभारला, तो एकट्याचा नव्हता. लढा एकटा कोणीच उभारू शकत नाही. त्यावेळी आमच्यासोबत पत्रकार, राजकीय संघटना, शेतकरी व सर्व स्तरातून प्रयत्न झाले. सरकारला तत्कालीन आमदारांनी सकारात्मकरित्या पटवून दिल्यानेच पाणी आले आहे. आता पारे व ढवळेश्वर तलावात पाणी येणार असल्याची घोषणा केली जात आहे. ती आम्ही गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचेच फलित आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून विटा पालिकेने स्वाइन फ्लूच नव्हे, तर कोणतेही साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले आहेत. यापुढेही ते अखंडपणे सुरूच राहणार आहेत.
त्यामुळे विटेकर नागरिकांच्या आरोग्याचे पुतना-मावशीचे प्रेम दर्शविण्यापूर्वी टीका करणाऱ्यांनी आपल्या गावाची परिस्थिती पाहावी. विकासाच्या लांब गप्पा मारण्यापूर्वी पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या गावातील स्मशानभूमीचे पत्रे बदलावेत, असा सल्लाही नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिला. (वार्ताहर)
उगीच उर बडवून घेऊ नये...
टेंभू उपसा सिंचन योजनेवर मत व्यक्त करणे, हा तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. यावर कोणी हुकूमशाही पध्दतीने मत व्यक्त करू नये. टेंभू योजनेचे खरे जनक संपतराव देशमुखच आहेत. त्यामुळे कोणी तरी उगीच उर बडवून घेऊ नये. शांतपणे योजनेतील त्रुटी, मतदार संघातील ४५-४६ गावे जी पाण्यापासून वंचित आहेत, त्यांच्याबाबतीत चुकलेले नियोजन मान्य करून त्यांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही नगराध्यक्ष वैभव पाटील यावेळी म्हणाले.