सांगलीतील सिग्नल यंत्रणेला तांत्रिक अडचणीचा फेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST2021-08-14T04:31:35+5:302021-08-14T04:31:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुसुत्रता येण्यासाठी आवश्यक असलेली सिग्नल यंत्रणा चार महिन्यांनंतर गुरुवारी पुन्हा सुरु ...

A technical problem with the signal system in Sangli | सांगलीतील सिग्नल यंत्रणेला तांत्रिक अडचणीचा फेरा

सांगलीतील सिग्नल यंत्रणेला तांत्रिक अडचणीचा फेरा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुसुत्रता येण्यासाठी आवश्यक असलेली सिग्नल यंत्रणा चार महिन्यांनंतर गुरुवारी पुन्हा सुरु करण्यात आली. मात्र, वायरिंगमधील अडचणी आणि गॅस पाईपलाईनसह खासगी कंपन्यांनी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी सिग्नल सुरु करता आले नाहीत. शहरात केवळ कर्मवीर चौकातील सिग्नल सुरु करण्यात आला तर विश्रामबाग, कॉलेज कॉर्नर, आझाद चौकातील सिग्नलच्या अडचणी अद्यापही कायम आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे शहरातील सिग्नल यंत्रणा मार्च महिन्यात बंद करण्यात आली होती. रस्त्यावरील वाहतूकही कमी असल्याने व पोलिसांना कोरोना नियंत्रणाचा बंदोबस्त असल्याने सिग्नलवरील गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला हाेता. यानंतर निर्बंध कायमच राहिल्याने सिग्नल बंदच ठेवण्यात आले. मात्र, गेल्या पंधरवड्यापासून शहरातील वाहतूक वाढत चालल्याने सिग्नल सुरु करण्याची मागणी होत होती.

गुरुवारपासून शहरातील विजयनगर व कर्मवीर चौकातील सिग्नल सुरु करण्यात आला. विश्रामबाग येथील चौकात गॅस पाईपलाईनसाठी ‘लेफ्ट साईट’ खोदून तिथेच माती टाकण्यात आली आहे तर पाईप टाकण्यासाठीची क्रेनही रस्त्यावरच असल्याने हा सिग्नल सुरु करण्यात आला नाही.

कॉलेज कॉर्नर येथे नुकतेच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, रुंदीकरणावेळी वायरिंग तुटल्याने या चौकातील सिग्नल बंद आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या आझाद चौकातील सिग्नलही वायरिंग खराब झाल्याने बंद आहे. शहरातील जादा वर्दळ असलेल्या सिव्हील हॉस्पिटल चौकातील सिग्नल रस्ता रुंदीकरणाअभावी रखडला आहे. तर सिग्नलवेळी वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने राजवाडा चौकातील सिग्नल यापूर्वीच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील आवश्यक असलेले सिग्नल सुरु केल्यास वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होणार आहे.

चौकट

महापालिका लक्ष देणार काय?

सिग्नल दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची असते. महापालिकेनेही स्थानिक कंत्राटदाराऐवजी बाहेरचा कंत्राटदार नेमल्याने खराब झालेल्या सिग्नलची वेळेत दुरुस्ती होत नाही. त्यामुळे वाहतुकीचा ताण वाढला आहे.

कोट

कोरोनाविषयक कडक निर्बंधांच्या कालावधीत बंद असलेले सिग्नल सुरु करण्यात आले आहेत. विश्रामबाग, कॉलेज कॉर्नर येथीलही सिग्नल लवकरच सुरु करण्यात येणार आहेत.

- प्रज्ञा देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

Web Title: A technical problem with the signal system in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.