जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांचा कस लागणार
By Admin | Updated: February 19, 2015 00:22 IST2015-02-19T00:09:35+5:302015-02-19T00:22:24+5:30
शिक्षक बँक निवडणूक : मेळावे, गाठी-भेटींवर भर, नव्या कायद्यामुळे व्यूहरचना बदलली

जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांचा कस लागणार
शीतल पाटील -सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. गेली पंधरा वर्षे दुरंगी, तिरंगी होणारी निवडणूक यंदा चौरंगी होण्याची शक्यता असली तरी, खरी लढत शिक्षक समिती, शिक्षक संघातील शि. द. पाटील, संभाजीराव थोरात या तीन गटांतच होईल. नव्या सहकार कायद्यामुळे संघटनांना निवडणुकीची व्यूहरचना बदलावी लागली असून, संपूर्ण जिल्ह्यातील सभासद उमेदवारांना मतदान करणार आहेत. त्यामुळे खऱ्याअर्थाने संघटना, नेत्यांची ताकदच स्पष्ट होणार आहे. शिक्षक बँकेचे राजकारण हा जिल्ह्यात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आतापर्यंत सभासदांनी कधीच एका संघटनेकडे सत्तेची सूत्रे दिलेली नाहीत. प्रत्येकवेळी आलटून-पालटून सत्ता सोपविली आहे. पाच वर्षांपूर्वी सभासदांनी शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर यांच्या नेतृत्वाखालील समितीला बहुमत दिले, पण दीड वर्षातच समितीतील संचालकांत फूट पडली. त्यातून शिक्षक संघ व फुटीर संचालक एकत्र आले. त्यांनी दीड ते दोन वर्षे सत्तेची चव चाखली. त्यानंतर पुन्हा काही संचालकांची घरवापसी झाल्याने सत्तेची सूत्रे समितीकडे आली आहेत. सत्तेच्या खेळखंडोब्यात पाच वर्षे निघून गेली असून, आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कच्च्या मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया लवकरच हाती घेतली जाणार आहे. सर्वसाधारणपणे एप्रिलचा शेवटचा आठवडा अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होईल, असा अंदाज आहे.
यंदा चौरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत. शिक्षक संघातील संभाजीराव थोरात, शि. द. पाटील गट, शिक्षक समिती व पुरोगामी संघटना यांनी तयारी सुरू केली आहे. थोरात गटातून विनायक शिंदे, जगन्नाथ कोळपे, सतीश पाटील, विजयकुमार चव्हाण यांनी जिल्हा दौरा सुरू केला आहे. सुट्टीदिवशी तालुकास्तरावर मेळावे, गाठीभेटींवर भर दिला आहे. नोकरभरती, व्याजदर, कोअर बँकिंग अशा काही मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठून सभासदांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. समितीकडून विश्वनाथ मिरजकर, किसन पाटील, किरण गायकवाड, सयाजीराव पाटील, बाबासाहेब लाड यांनी सूत्रे हाती घेतली आहे. प्रत्येक तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन व्यूहरचना आखली जात आहे. गेल्या दोन वर्षात सत्ताधाऱ्यांनी घेतलेले हिताचे निर्णय सभासदांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघाच्या काळातील भ्रष्टाचाराचा मुद्दाही ऐरणीवर आणला आहे.
शिक्षक संघाकडून ग. चिं. ठोंबरे, मुकुंद सूर्यवंशी, तानाजी जाधव, महावीर बस्तवडे यांनी मोर्चा सांभाळला आहे. गेल्या पाच वर्षांतील थोरात गट व समितीचा कारभार सभासदांसमोर मांडला जात आहे. त्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. एकूणच बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वच संघटनांनी बाह्या सरसावल्या असून, मेळावे, दौरे, बैठकांचा जोर चढला आहे. प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांनी मैदान आणखी तापणार आहे.
शि. द. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. तालुकावार बैठका, मेळावा घेऊन सभासदांत जागृती केली. जिल्हास्तर मतदारसंघ असल्याने त्याचा संघाला निश्चितच फायदा होईल. संघटनेची पाळेमुळे वाडीवस्तीपर्यंत पोहोचली आहेत. त्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून कमी लाभांश, व्याजदर न कमी करणे, यासह विविध मुद्दे सभासदांसमोर मांडले जात आहेत. या निवडणुकीत निश्चितच सभासद परिवर्तन करतील.
- मुकुंद सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ
वाढीव नोकर भरती, कोअर बँकिंगला विलंब या मुद्द्यांबरोबरच पाच वर्षांत समितीने व्याजदर कमी केलेले नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावर अर्धा टक्का व्याजदर कमी करून सभासदांच्या तोंडाला पाने पुसली. थोरात गटाकडे सत्ता असताना कमी नफा मिळूनही सभासदांना जादा लाभांश दिला होता; पण गेल्या तीन वर्षाचे मिळून पावणेदहा टक्के लाशांभ दिला आहे. बँकेत समितीकडून उधळपट्टी सुरू असून, त्याचा कारभार सभासदांसमोर मांडणार आहोत.
- विनायक शिंदे, अध्यक्ष थोरात गट
शिक्षक समितीने सत्तेच्या काळात नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचीच अंमलबजावणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही. केवळ सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्हीही गेल्या पाच वर्षात समितीच्या काळातील पारदर्शी व सभासदाभिमुख हिताचे निर्णय पोहोचवू. यंदा आम्ही इतिहास घडवणार आहोत.
- विश्वनाथ मिरजकर, राज्य नेते शिक्षक समिती