समाजात संवेदनशीलता वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:06+5:302021-09-26T04:28:06+5:30
इस्लामपूर : आजच्या जागतिकीकरणाच्या काळात भौतिक साधनांच्या मोहात गुरफटलेल्या समाजाला दिशा देऊन समाजात संवेदनशीलता वाढविण्यासाठी शिक्षकांनी अधिक प्रयत्न करण्याची ...

समाजात संवेदनशीलता वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा
इस्लामपूर : आजच्या जागतिकीकरणाच्या काळात भौतिक साधनांच्या मोहात गुरफटलेल्या समाजाला दिशा देऊन समाजात संवेदनशीलता वाढविण्यासाठी शिक्षकांनी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले.
येथील जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेलीच्या वतीने आयोजित जायंट्स आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. सहेलीच्या अध्यक्षा आणि बांधकाम सभापती सुनीता सपकाळ अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी फेडरेशनचे संचालक भूषण शहा, श्रद्धा कुलकर्णी, संगीता शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वातील गुणांची जाणीव करून द्यायला हवी. तरच, ते स्वतःचे स्थान निर्माण करतील. मी यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शून्य टक्के व्याजाने आठ कोटी रुपये दिले. सहेलीच्या सर्व महिला कौटुंबिक जबाबदारी सांभाळून सामाजिक कार्य करतात, हे कौतुकास्पद आहे.
यावेळी डाॅ. संजय थोरात, डाॅ. अशोक शिंदे, प्रा. मंगल पाटील, प्रा. कृष्णा मंडले या शिक्षकांना दिलीप पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सुनीता सपकाळ यांनी स्वागत केले. भूषण शहा यांनी परिचय करून दिला. संगीता शहा यांनी शिक्षकांचा गौरव करण्याची भूमिका मांडली. प्रिया बोंगाळे यांनी आभार मानले. चारुशीला फल्ले यांनी सूत्रसंचालन केले. जायंट्स सहेलीच्या प्रतिभा शहा, शोभा पाटील, रचना शिंदे, डाॅ. अनिता पाटील, डाॅ. अश्विनी पाटील, उषा पंडित, माधुरी फल्ले, लता पाटील, राकेश कोठारी उपस्थित होते.
फोटो : २५ इस्लामपुर १
ओळ : इस्लामपूर येथे जायंट्स आदर्श शिक्षक पुरस्काराने मंगल पाटील यांचा दिलीप पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी भूषण शहा, लता पाटील, सुनीता सपकाळ, श्रद्धा कुलकर्णी उपस्थित होत्या.