विटा : पाडळी, बामणी, धामणी व हातनोलीच्या सरहद्दीवर असलेल्या संत ज्ञानेश्वर विद्यालयाने मुख्याध्यापक के. के. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वाढीसाठी ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला असून, शासनाच्या सेतू अभ्यासक्रमाचा भाग असलेल्या या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचे श्री स्वामी दौलतगिरीजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी स्वागत केले आहे.
मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी, तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्व तयारी, हा दुहेरी उद्देश ठेवून शासनाने ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम मागील वर्षाच्या इयत्तेवर तयार केला आहे. शाळांमध्ये ऑनलाईन अभ्यासक्रम पाठविला जात आहे. परंतु, ग्रामीण भागातील बहुतेक पालकांकडे स्मार्टफोन नाहीत, तसेच काही पालकांकडे स्मार्टफोन असला, तरी त्याला इंटरनेट रेंज मिळत नसते किंवा दर महिन्याला महाग रिचार्ज करणे त्यांना शक्य होत नाही.
त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्याचाच विचार करून खानापूर व तासगाव तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या पाडळी, बामणी, धामणी व हातनोली संयुक्त हद्दीवरील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे अध्यक्ष हेमंत पाटील व मुख्याध्यापक के. के. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दारी पोहोचून शैक्षणिक क्षमता वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
याव्दारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरात जात असून, तेथे ऑनलाईन तासिकांचा आढावा घेणे, सेतू अभ्यासक्रमांतील अडचणी समजावून घेणे, स्वाध्याय तपासणे, विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यालयातील शिक्षिका छाया शेंडगे, सीमा गुरव, पूनम शिंदे, जयनी लवटे, किरण पाटील, संभाजी गोसावी उपस्थित होते.
फोटो - १६०७२०२१-विटा-पाडळी : पाडळी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाने ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला असून, शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरात जाऊन शैक्षणिक क्षमता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत.