शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न गंभीर
By Admin | Updated: December 17, 2015 01:22 IST2015-12-17T00:13:10+5:302015-12-17T01:22:11+5:30
आंदोलनाचा इशारा : पगार वेळेवर करण्याची शिक्षक संघाची मागणी

शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न गंभीर
सांगली : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा गेल्या सहा महिन्यांपासून वेळेवर पगार होत नाही. डिसेंबर निम्मा संपला तरीही जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार झालेले नाहीत. म्हणून शिक्षकांसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी बुधवारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांची भेट घेतली आहे. जर येत्या दोन दिवसात शिक्षकांचे पगार झाले नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे व अविनाश गुरव यांनी दिला आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे सहा महिन्यांपूर्वी दर महिन्याच्या एक तारखेला पगार होत होते. परंतु, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षकांचे पगारच वेळेवर होत नाहीत. दोन ते तीन महिने शिक्षकांचे पगार होत नाहीत.बुधवारी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने प्रभारी मुख्य कार्यकारी पाटील यांची भेट घेऊन पगाराच्या विलंबाबत विचारणा केली. यावेळी पाटील यांनी शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांना बोलावून शिक्षकांचे पगार वेळेवर करण्याची सूचना केली. यावेळी शिक्षक संघाचे विनायक शिंदे, अविनाश गुरव, हंबीरराव पवार, शशिकांत माणगावे, सलीम मुल्ला, सतीश पाटील, चंद्रकांत कांबळे, महादेव हेगडे, तानाजी खोत, सुनील गुरव आदींनी शिक्षकांच्या पगारासह विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी द्या, शिक्षकांच्या विविध प्रलंबित बिलासाठी आॅफलाईन पैसे वर्ग करावेत, आंतरजिल्हा बदलीचे ना-हरकत पत्र द्यावे, महापालिका व नगरपालिकेतून जिल्हा परिषदेकडे समायोजनाने आलेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ नेमणूक तारखेनुसार सेवाज्येष्ठता ठरविण्यात यावी, आदी मागण्या केल्या. (वार्ताहर)
तीव्र असंतोष --निम्मा डिसेंबर संपला तरी, नोव्हेंबर महिन्याचे शिक्षकांचे पगार झालेले नाहीत. पगार वेळेवर होत नसल्यामुळे शिक्षकांचे बँकांचे असणारे हप्ते थांबत आहेत. अनेकवेळा दंडही कर्जावर भरावा लागत आहे. यामुळे शिक्षकांतून जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.