शिक्षक बँकेची सभा गोंधळातच गुंडाळली

By Admin | Updated: September 6, 2015 22:58 IST2015-09-06T22:58:29+5:302015-09-06T22:58:29+5:30

‘मंजूर-नामंजूर’च्या घोषणा : सत्ताधाऱ्यांचा वरचष्मा कायम; विरोधकांकडून घोषणाबाजी, निदर्शने

Teachers' meeting was confused with the bank | शिक्षक बँकेची सभा गोंधळातच गुंडाळली

शिक्षक बँकेची सभा गोंधळातच गुंडाळली

सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत रविवारी शिक्षक सभासदांनी यंदाही गोंधळाचा धडा गिरविला. मंजूर, नामंजूरच्या घोषणांनी दीनानाथ नाट्यगृह दणाणून गेले होते. दोन टक्के लाभांश, नोकरभरती व जागा खरेदीच्या मुद्द्याला विरोधकांनी विरोध केला. पण सत्ताधारी समितीच्या सभासदांनी मंजुरीच्या घोषणा देत अर्ध्या तासातच सभा गुंडाळली.
शिक्षक बँकेची सभा म्हणजे गोंधळ, हे समीकरण यंदाही कायम राहिले. गेल्या आठ दिवसांपासून दोन टक्के लाभांश व जागा खरेदीचा विषय गाजत होता. सत्ताधारी शिक्षक समिती व शिक्षक संघाचे शि. द. पाटील व संभाजीराव थोरात गटात आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला होता. त्यामुळे सभेत गोंधळ होणार, हे नक्की होते. सभेआधी अर्धा तास सभागृह खचाखच भरले होते. थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, अविनाश गुरव, सतीश पाटील यांनी सभागृहाबाहेरच फलक हाती घेत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात निदर्शने केली, तर शि. द. पाटील गट व बँक बचाव कृती समितीचे सभासद काळ्या फिती लावून सभागृहात दाखल झाले होते. सभा सुरू होण्यापूर्वीच आरोप-प्रत्यारोप सुरू होते. विरोधकांकडून वारंवार टिप्पणी होऊ लागल्याने समिती व संघाच्या सभासदांत वादावादी झाली. सभा सुरू झाल्यानंतर अध्यक्ष तुकाराम गायकवाड यांनी स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी एन. आर. पाटील यांनी अहवाल वाचन केले. अहवाल वाचनावेळी सभासदांतून माईकची मागणी होऊ लागली. पण अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष करीत सभा सुरू ठेवली. याचवेळी व्यासपीठावर विनायक शिंदे, अविनाश गुरव या विरोधी संचालकांनीही सभासदांना माईक द्या, अशी मागणी केली. त्यातून सत्ताधारी व विरोधी संचालकांत बाचाबाची झाली. गेल्या सभेच्या इतिवृत्त वाचनात वीस मिनिटे घालविल्यानंतर अध्यक्ष गायकवाड यांनी माईकचा ताबा घेत अजेंड्यावरील विषयाचे वाचन सुरू केले. त्याला समितीच्या सभासदांनी मंजूर म्हणत प्रतिसाद दिला, तर विरोधी सभासदांनी विषयाला विरोध करीत व्यासपीठासमोर जमा झाले. तोपर्यंत उपाध्यक्ष महादेव माळी यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि अध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केले. सभासदांनी प्रश्न विचारण्याची संधी द्या म्हणून गोंधळ घातला. तोपर्यंत सत्ताधारी संचालकांनी सभागृह सोडले होते. (प्रतिनिधी)


कायदेशीर लढा देणार : विनायक शिंदे
सभागृहात ८० टक्के सभासदांचा जागा खरेदी व लाभांश वाटपाला विरोध होता. त्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी विषयाचे वाचन करीत सभा गुंडाळली आहे. सभासदांच्या एकही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. सभेत सत्ताधारी सभासदांनीच गोंधळ घातला. सत्ताधाऱ्यांच्या ठोकशाहीविरोधात आम्ही सहकार न्यायालयात कायदेशीर लढा देणार असून, निश्चित न्याय मिळेल, असे विरोधी संचालक विनायक शिंदे, अविनाश गुरव यांनी सांगितले. ...


विरोधकांनीच गोंधळ घातला - सयाजीराव पाटील
सभा शांततेत पार पाडण्यासाठी अध्यक्षांनी वारंवार विनंती केली. पण विरोधकांनीच गोंधळ घातला. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी दर्शविली होती. विरोधी संचालकांनीच सभासदांना दंगा करण्यास उद्युक्त केले, असा आरोप समितीचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी केला.

Web Title: Teachers' meeting was confused with the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.