शिक्षकांना आस नवनवीन शिकण्याची

By Admin | Updated: September 5, 2014 00:09 IST2014-09-05T00:02:02+5:302014-09-05T00:09:31+5:30

आशादायी चित्र : एकापेक्षा अधिक पदव्यांना जिल्ह्यातील शिक्षकांची पसंती

Teachers learn new things | शिक्षकांना आस नवनवीन शिकण्याची

शिक्षकांना आस नवनवीन शिकण्याची

नरेंद्र रानडे -सांगली --प्रत्येकजण जीवनाच्या अंतापर्यंत विद्यार्थीच असतो, असे म्हटले जाते. परंतु शाळेत विद्यार्र्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देणारे शिक्षकही स्वत:ला विद्यार्थीच समजतात, हे कितीजणांना माहीत आहे? ‘सतत नव्या ज्ञानाचा हव्यास हवा’ या सूत्रानुसार, प्राप्त शिक्षणावरच समाधान न मानता जिल्ह्यातील चारशेहून अधिक शिक्षकांनी उच्चशिक्षणासाठी, इतर अभ्यासासाठी-पदव्यांसाठी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. काहीजण शिक्षणव्रत सांभाळून सामाजिक बांधिलकी तसेच विविध कला जोपासण्यात आनंद मानत आहेत...
विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांच्या मनात, आपणही खूप शिकावे, ही इच्छा असतेच. मात्र दिवसभरातील ज्ञानदानाच्या कार्यातून कित्येकांना वेळ मिळत नसतो. असे असले तरीही येथील मुक्त विद्यापीठाच्या दोन केंद्रांत तब्बल चारशेहून अधिक शिक्षक, शिक्षिकांनी प्रवेश घेतला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या बहिस्थ शिक्षणक्रमाच्या माध्यमातूनदेखील जिल्ह्यातील शिक्षक ‘विद्यार्थी’ बनून शिक्षणाचे धडे घेत आहेत. ज्या शिक्षकांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे, त्यांचा कल पदव्युत्तर शिक्षणाकडे आहे. अनेक शिक्षक इतर विषयांतही पदव्युत्तर होण्यासाठी धडपडत आहेत. प्रामुख्याने भाषा विषय, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र शाखेकडे कल आहे. आश्रमशाळेत असलेल्या शिक्षकांचा ‘मास्टर आॅफ सोशल वर्क’ हा दोन वर्षाचा शिक्षणक्रम पूर्ण करण्याकडे ओढा आहे. शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्यांचे इतिवृत्त तयार करता यावे, यासाठी ‘बॅचलर आॅफ जर्नालिझम’साठी काही शिक्षक प्राधान्य देत आहेत. एम.एस.डब्ल्यू., पीएच्.डी. यासाठी प्रवेश घेण्यासही काही शिक्षकांची पसंती आहे.

तुंग प्राथमिक शाळेतील संपत कदम आणि समडोळी येथील प्राथमिक शाळेतील कृष्णात पाटोळे यांनी लोकसाहित्याचा वसा जपण्यासाठी ‘भूपाळी ते भैरवी’ या अडीच तासाच्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. बुरुंगवाडी येथील ब्रह्मानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय जाधव यांची, २००५ मध्ये आलेल्या महापुरावर आधारित ‘महाप्रलयकार’ ही कादंबरी पुढील महिन्यात प्रकाशित होत आहे. भिलवडीतील आदर्श बालक मंदिर येथे शिक्षक असलेले शरद जाधव मागील पंधरा वर्षांपासून एकपात्री कार्यक्रम करीत आहेत. सांगलीतील यशवंतनगर येथील सदानंद कदम भोसे येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. ते इतिहाससंशोधक म्हणून परिचित आहेतच, याशिवाय त्यांचा मोडी लिपीचा सखोल अभ्यास आहे. शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील बाबासाहेब परीट हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभर कथाकथनाचे कार्यक्रम करीत आहेत. विश्व मराठी साहित्य संमेलनात त्यांना कथाकथनासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

सामाजिक जाणिवांतूनही वाढतोय कल
शिक्षकांना नवीन शिकण्याची तसेच शिक्षकी पेशा सांभाळून समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा आहे, याचा अंदाज त्यांच्या धडपडीतून येतो. पलूस तालुक्यातील आंधळी येथील हिंदकेसरी गणपतराव आंदळकर विद्यालयातील अमर पाटील यांनी आतापर्यंत नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेकरिता अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. सध्या ते इंग्रजीत एम.ए. करत आहेत. दुधगाव येथील जि. प. शाळेतील शिक्षक रघुनाथ हेगणावर यांनी केवळ नऊ वर्षात बी.ए., बी.एड., डी.एस.एम., एम.एस.डब्ल्यू. अशा अभ्यासक्रमात यश संपादन केले आहे. ते पीएच्.डी. पूर्ण करणार आहेत. कडेगावचे गटशिक्षणाधिकारी गजानन उकीरडे ‘नेट’ उत्तीर्ण असले तरी, शिक्षणशास्त्र या विषयात पीएच्.डी.ची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

Web Title: Teachers learn new things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.