२५ एप्रिलला शिक्षक बँकेची निवडणूक
By Admin | Updated: March 22, 2015 00:24 IST2015-03-22T00:24:54+5:302015-03-22T00:24:54+5:30
एस. एन. जाधव : सोमवारपासून प्रक्रिया

२५ एप्रिलला शिक्षक बँकेची निवडणूक
सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, यासाठी आता २५ एप्रिलरोजी मतदान होणार आहे. ही माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी दिली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता सोमवार (२३ मार्च) पासून निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ आहे.
निवडणुकीचा बिगुल कधीच वाजला असला तरी निवडणुकीचा कार्यक्रम मात्र अद्याप जाहीर झालेला नव्हता. जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी आज (शनिवार) शिक्षक बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २३ ते २७ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २५ एप्रिलरोजी मतदान घेण्यात येणार आहे. शिक्षक बँकेसाठी ५ हजार ९६७ मतदार आहेत. निवडणुकीसाठी निधी भरण्याच्या सूचनाही बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
ही निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता असून, यासाठी प्रचाराला चारही संघटनांनी यापूर्वीच सुरुवात केली आहे. यावेळी २१ संचालक पदासाठी निवडणूक होत आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातील १६ संचालक असून, ओबीसी, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती या गटातून प्रत्येक एक आणि महिला राखीव गटातून दोन जागा आरक्षित आहेत. (प्रतिनिधी)