शिक्षकाचे बालक वाचविण्यासाठी शिक्षक परिषद धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:01+5:302021-09-02T04:55:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विनाअनुदानित शाळेवर काम करणारे शिक्षक अनिल राठोड यांच्या अकरा दिवसांच्या बालकाच्या आतड्याला जंतुसंसर्ग ...

शिक्षकाचे बालक वाचविण्यासाठी शिक्षक परिषद धावली
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विनाअनुदानित शाळेवर काम करणारे शिक्षक अनिल राठोड यांच्या अकरा दिवसांच्या बालकाच्या आतड्याला जंतुसंसर्ग झाला आहे. त्यांच्या मदतीसाठी खासगी प्राथमिक शिक्षक परिषदचे पदाधिकारी धावले. दिवसात ७६ हजार रुपये जमा झाले असून, ते राठोड यांच्याकडे सोपवले.
राठोड यांचे मूळ गाव जत आहे. सध्या ते आष्टा (ता. वाळवा) येथे गोविंदराव लिमये प्राथमिक शाळेत विनाअनुदानित वर्गावर शिक्षक आहेत. त्यांच्या बाळाला जंतुसंसर्ग झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले. औषधोपचारासाठी दिवसाला दहा ते बारा हजार रुपये खर्च आहे. राठोड यांनी स्वत:कडील व नातेवाईकांनी दिलेल्या मदतीतून अनामत रक्कम भरली. पुढच्या खर्चाची तरुतद कशी करायची, या विवंचनेत ते होते. शेवटचा पर्याय म्हणून शिक्षक परिषदेचे मार्गदर्शक चंद्रकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे, उदयसिंह भोसले यांना साकडे घातले. या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक परिषदेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून मदतीचे आवाहन केले. पाचशे ते पाच हजार रुपये अशी ७६ हजार रुपयांची मदत केवळ चोवीस तासांत जमा झाली. माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्याहस्ते राठोड यांच्या परिवाराला ती देण्यात आली. डॉक्टरांना भेटून विनाअनुदानित शाळेतील शिक्षकाचे बाळ आहे, शक्य होईल तेवढी मदत करा, असे आवाहनही केले.
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे, कार्यवाह संतोष जाधव, प्रवक्ते उदयसिंह भोसले, चंद्रकांत चव्हाण, वाळवा तालुकाध्यक्ष दत्तात्रय डफळे, पलूस तालुकाध्यक्ष शरद जाधव, प्रवीण खोत, शंकर हणमापुरे, सूर्यकांत माळी, विठ्ठल खुटाण आदी उपस्थित होते.